संशोधनाला चालना, भौतिक सुविधांवर भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संशोधनाला चालना, भौतिक सुविधांवर भर
संशोधनाला चालना, भौतिक सुविधांवर भर

संशोधनाला चालना, भौतिक सुविधांवर भर

sakal_logo
By

विद्यापीठ लोगो
...

संशोधनाला चालना, भौतिक सुविधांवर भर

शिवाजी विद्यापीठाचे यंदा ५३८ कोटींचे ‘बजेट’; कुस्ती संकुल, फुटबॉल मैदान साकारणार

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १० ः शिवाजी विद्यापीठाने यंदाच्या अंदाजपत्रकात (बजेट) रिसर्च स्कीम, स्कॉलर होस्टेल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून संशोधनाला चालना आणि वसतिगृह, कॅम्पसमधील अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत, सुशोभिकरण, अकॅडमिक, इनडोअर स्पोर्टस कॉम्प्लेक्स, सौरयंत्रणा, अशा भौतिक सुविधांवर भर दिला आहे. ५३८ कोटी २९ लाख रूपयांचे अंदाजपत्रक सिनेटने (अधिसभा) शुक्रवारी मंजूर केले. त्यामध्ये ५ कोटी ३० लाखांची तूट असून ती विद्यापीठ निधीतील शिल्लकेतून भरून काढली जाणार आहे.
या अंदाजपत्रकात विद्यापीठाने यावर्षी सहा नव्या तरतुदी केल्या आहेत. त्यात कुस्ती संकुलासाठी ५० लाख, तर फुटबॉलसाठी तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज मैदानासाठी १० लाख, इन्सेंटीव्ह अवॉर्डसाठी ५ लाख, हेल्थ कार्ड संगणकप्रणाली आणि संवादकौशल्य वाढीच्या सेमिनारसाठी प्रत्येकी १० लाख, तर पोस्ट डॉक्टरल फेलोशीपसाठी ४० लाख रूपयांची तरतूद केली आहे. देखभाल, विकास, वेतन, संस्था योजना, निलंबन लेखे या विभागांतील अंदाजपत्रक सिनेट सदस्य प्रा. रघुनाथ ढमकले यांनी मांडले. त्यावर श्‍वेता परूळेकर, संजय परमाणे, विष्णू खाडे, डी. एन. पाटील, अभिषेक मिठारी, प्रकाश कुंभार, मनोज गुर्जर, अमित कुलकर्णी आदी सदस्यांनी काही सूचना, मते मांडली. त्याबाबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे आणि डॉ. ढमकले यांनी स्पष्टीकरण दिले. त्यानंतर सदस्यांनी या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. त्यामध्ये एकूण ५३२ कोटी ९९ लाख अपेक्षित जमा, तर ५३८ कोटी २९ लाख इतका अपेक्षित खर्च आहे. त्यात शैक्षणिक-संशोधन कार्यासाठी ऑनलाईन बुक्स अँड जर्नल्स खरेदी ( २ कोटी ८५ लाख), विद्यार्थिनी वसतिगृह (२ कोटी ५४ लाख), विद्यार्थी वसतिगृह (२ कोटी ६७ लाख), रिसर्च स्कॉलर होस्टेल (६५ लाख), रिसर्च स्कीम (२ कोटी २५ लाख), दिव्यांगासाठी सुविधा (२ कोटी २५ लाख) आदी २८ घटकांसाठी तरतूद केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ३७ लाखांनी ‘बजेट’ कमी झाले आहे.
...

‘बजेट’मधील काही ठळक तरतूदी

-मेरीट स्कॉलरशीप ः ६० लाख
-कमवा व शिका मुलींचे वसतिगृह ः ३८ कोटी
-परदेशी विद्यार्थ्यांसाठी सुविधा ः ४७ कोटी
-कॅम्पसमधील रस्‍त्यांसाठी ः २ कोटी २५ लाख
-नवीन सौरयंत्रणा ः ३ कोटी
-इनडोअर स्पोर्टस कॉम्प्लेक्स ः १ कोटी
-विद्यार्थी कल्याण व युवा वसतिगृह ः २ कोटी
-संगणकशास्त्र इमारत विस्तारीकरण ः १ कोटी
...

अपेक्षित जमा (रक्कम कोटींमध्ये)

-प्रशासकीय ः ३७.१४
-शास्त्र ः ४.८५
-इतर अधिविभाग ः २.४७
-इतर उपक्रम ः२५.२८
-वेतन अनुदान ः १२५.३०
-विविध संस्था ः १८.३७
-संशोधन व विकास निधी ः ३२.१०
-घसारा निधी ः १२.०१
-निलंबन लेखे ः २७५.४७
...

अपेक्षित खर्च (रक्कम कोटींमध्ये)
-प्रशासकीय ः ५८.४०
-शास्त्र ः ७.५९
-इतर अधिविभाग ः ६.२६
-इतर उपक्रम ः४७.७३
-वेतन अनुदान ः १३२.०८
-विविध संस्था ः ६.१३
-संशोधन व विकास निधी ः ३२.१०
-घसारा निधी ः १२.०१
-निलंबन लेखे ः २३५.९९
...


‘सध्या विद्यापीठाच्या अंदाजपत्रकातील जमा बाजूमध्ये घट असताना देखील विद्यार्थी सुविधा आणि शैक्षणिक, संशोधनपर बाबींवर जास्त तरतुदी केल्या आहेत. विद्यार्थीकेंद्रीत बजेट आहे.
-डॉ. व्ही. एम. पाटील, सचिव, विद्यापीठ विकास आघाडी
...


‘बजेट वरकरणी ‘फिल गुड’ आहे. मात्र, प्रत्यक्षात ते फुगवट्याचे आणि विद्यापीठाच्या स्वनिधीवरील बोजा वाढवणारे आहे. जमा पेक्षा खर्चाची बाजू जास्त आहे. विद्यार्थ्यांच्या पैशावरती केलेली उधळपट्टी उघड आहे.
- डॉ. डी. एन. पाटील, सुटा, प्रमुख कार्यवाह
...

पेपरलेस बजेट
वेबबेस प्रणालीमध्ये सर्व विभाग, अधिविभागांनी जमा-खर्चाची माहिती भरल्याने पेपरलेस बजेट झाले. बजेटचा मसुदा डॉ. पी. आर. पवार, ए. एम. सरवदे, एस. बी. महाडिक यांच्या समितीने तयार केला.