
जयश्री जाधव
मराठा आरक्षणाचे आश्वासन का नाही ?
जयश्री जाधव ः राज्यपालांच्या अभिभाषणावर नाराजी
कोल्हापूर, ता. १० ः राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणात मराठा आरक्षणाबात कोणतेही आश्वासन नसल्याने आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी नापसंती व्यक्त केली. राज्यपालांच्या अभिभाषणावर हरकत घेऊन खेद व्यक्त करण्याचे निवेदन त्यांनी प्रधान सचिवांकडे दिले.
राज्यातील आर्थिकदृष्टया मागासलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्याची नितांत आवश्यकता आहे. परिणामी समाजाने अनेकदा आंदोलने, मोर्च काढलेले आहेत. तसेच राज्यातील मुस्लीम समाजाला ५% आरक्षण तत्कालीन राज्य शासनाने जाहीर केले होते. परंतु, अद्यापही आरक्षण देण्याबाबत कोणतीही उपाययोजना करण्याची माहिती राज्यपालांनी केलेल्या भाषणात नाही. त्यामुळे राज्यातील मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. राज्यपालांच्या अभिभाषणात राज्यातील प्रमुख आर्थिक दृष्ट्या मागास मराठा समाजाला न्याय देण्याची नितांत गरज होती. त्याशिवाय राज्यातील मुस्लिम समाजालाही न्याय देण्याची गरज होती, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.