
१० वर्षांपूर्वीचा चोरटा सापडला
88377
...
दोन वर्षांपासून फरारी संशयित गजाआड
चांदीच्या दुकानातील १० लाखांवर मारला होता डल्ला
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः चांदीच्या दुकानातून १० लाखांची रोकड लंपास केल्याच्या संशयावरून जनार्दन नामदेव सुतार (वय ३३, रा. प्लॉट न. ८५७/३७, साई कॉलनी, महावीरनगर, हुपरी) याला आज अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याला कराड येथून ताब्यात घेतले. गेल्या दोन वर्षांपासून हुपरी पोलिस त्याचा शोध घेत होते.
याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश अनिल पाटील यांचे हुपरी येथे महेश ऑर्नामेंट नावाचे चांदीचे दुकान आहे. तेथे सात ते आठ कामगार काम करतात. २५ डिसेंबर २०२० रोजी त्यांच्या दुकानातील स्ट्राँगरूममध्ये ठेवलेले १० लाख रुपये दुकानातील कामगार जनार्दन सुतारने चोरल्याचा महेश यांचा आरोप असून, याबाबतची फिर्याद त्यांनी हुपरी पोलिस ठाण्यात दिली होती. मात्र, त्यानंतर जनार्दन फरार होता. गेल्या आठवड्यात पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी फरार आरोपी शोधण्याची मोहीम सुरू केली. त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी पथक तयार केले होते. गुन्हे अन्वेषण विभागातील अंमलदार सुरेश पाटील यांना जनार्दन हा कराड येथे राहात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कराड येथे जाऊन सुतारला अटक केली.
ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक विनायक सपाटे, सुरेश पाटील, रणजित पाटील, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे संजय पडवळ, संतोष पाटील यांनी केली.