श्रीपादवाडी, नागवे परिसरात वानरराज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीपादवाडी, नागवे परिसरात वानरराज
श्रीपादवाडी, नागवे परिसरात वानरराज

श्रीपादवाडी, नागवे परिसरात वानरराज

sakal_logo
By

88601
श्रीपादवाडी ः वानरांच्या कळपाने केळीचा घड फस्त केला असून केवळ कोकाच लोंबकळत आहे.
88602
झाडावर बसलेले वानर.

श्रीपादवाडी, नागवे परिसरात वानरराज
पिकांसह मालमत्तेचे नुकसान; वन विभागाकडून प्रतिबंध करण्याची मागणी
सुनील कोंडुसकर : सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १२ : केळीच्या झाडांवरील घड गायब झालेत, त्याचा केवळ कोकाच लोंबकळत आहे. चिक्कूच्या झाडाखाली अर्धवट खालेल्या फळांचा सडा पडलेला आहे. एका घरावरून दुसऱ्या घरावर उड्या घालून छप्पराची पार वाट लागली आहे. पाण्याच्या टाक्या, डिजिटल फलकसुद्धा त्यांच्या तावडीतून सुटलेले नाहीत. विजेच्या सर्व्हिस वायर जागोजागी तोडल्या आहेत. फणसाची कोवळी फळे, परसातील मांडवावर लगडलेल्या शेंगा, शेवग्याच्या शेंगांवर त्यांचीच मालकी आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात श्रीपादवाडी, नागवे, इनाम कोळिंद्रे परिसरात वानरांच्या कळपाकडून सुरू असलेली ही रोजची स्थिती. स्थानिक नागरिक त्यांच्या या उपद्रवाने कंटाळून गेले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरील परिसर निसर्गरम्य आहे. आंबा, काजू, फणस, पेरु, चिक्कू, केळी यांसह विविध प्रकारची फळपिके या भागात पिकतात. सध्या या सर्वच पिकांचा हंगाम आहे. कोवळी पालवी आणि कोवळी फळे वानरांसाठी उत्तम खाद्य आहे. या विभागात गवे, रानडुक्कर, अस्वल यासारख्या वन्य प्राण्यांचा पूर्वीपासून त्रास आहे. त्यात गेल्या काही वर्षापासून हत्तीची भर पडली आहे. हे प्राणी शेतातील पिकांचे नुकसान करीत असत. वानरांचा कळप मात्र थेट गावात येऊन परसातील फळांचे नुकसान करीत आहे. पंधरा ते पंचवीस किलो वजनाचे हे प्राणी झाडावरुन किंवा एका घरावरून दुसऱ्या घरावर उडी मारतात त्यावेळी खापऱ्यांचा चक्काचूर होतो. पाण्याच्या प्लास्‍टिकच्या टाक्या, दूरचित्रवाणीसाठी लावलेले अॅंटिनावर उड्या मारल्याने मोडतात. त्यांना भीती घालायला गेले तर उलटे अंगावर येतात. त्यांचे ते रौद्र रुप पाहून नागरिकही घाबरतात. एकापाठोपाठ एक नवनवीन प्राणी दाखल होऊन नुकसान करीत असल्याने शेती करायची कशी असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. वन विभागाने या वानरांना पकडून जंगलात सोडावे, अशी मागणी होत आहे.
----------------
कोट
आमच्या भागात वन्यप्राण्यांचा त्रास नेहमीचाच आहे. परंतु तो शेतातील पिकांना. रात्रीची रखवाली करून शेतकरी त्या पिकांची राखण करू शकतो. परंतु वानरांच्या कळपाकडून शेताबरोबरच परसातील पिकांचेही नुकसान सुरू आहे. त्यांना हुसकवायला गेले, तर अंगावर धाऊन येतात. वन विभागानेच त्यांचा बंदोबस्त करायला हवा.
- रमेश सामंत, शेतकरी, श्रीपादवाडी