स्थगितीच्या लेखी आदेशाचा नाही पत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्थगितीच्या लेखी आदेशाचा नाही पत्ता
स्थगितीच्या लेखी आदेशाचा नाही पत्ता

स्थगितीच्या लेखी आदेशाचा नाही पत्ता

sakal_logo
By

81842
स्थगितीच्या लेखी आदेशाचा नाही पत्ता
वाढीव हद्द विकास आराखडा; गडहिंग्लजला १७६ हरकतींची होणार सुनावणी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ : शहराच्या वाढीव हद्दीच्या विकास आराखड्याला तात्पुरती स्थगिती मिळाल्याची चर्चा रंगली होती. त्याच्या श्रेयासाठी सारेच राजकीय पक्ष चढाओढ करीत होते. परंतु, त्याचा लेखी आदेश अजूनही पालिकेला मिळालेला नाही. दरम्यान, या विकास आराखड्यावर दाखल झालेल्या १७६ हरकतींवर लवकरच सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले.
शहराची हद्दवाढ तीन वर्षांपूर्वी झाली आहे. त्याच्या स्वतंत्र विकास आराखड्याला चौथे वर्ष उजाडले. पालिकेने आराखड्याला प्रसिद्धी देऊन हरकती दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली होती. १० फेब्रुवारी हरकती दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या मुदतीअखेर १७६ हरकती दाखल झाल्या आहेत. हरकतींचा अहवाल पालिकेतर्फे नगररचनाच्या सहाय्यक संचालकांना दिला जाईल. त्यानंतर सहाय्यक संचालकांनी सुनावणीची तारीख दिल्यानंतर त्यादृष्टीने नोटिसा पाठवण्याची तयारी पालिकेने केल्याचे सांगण्यात आले.
या आराखड्यात २४ आरक्षणे निश्‍चित केली आहेत. यातील केवळ दोनच आरक्षणे सरकारी जमिनीवर असून उर्वरित सर्व खासगी जमिनीवर आहेत. याशिवाय वारंवार येणाऱ्‍या पूररेषेत दफनभूमी, उद्यान, कचरा डेपोच्या आरक्षणामुळे शेतकरी संतप्त झाले होते. ही आरक्षणे विकसित झाले तरी त्याचा उपयोग काय, असा प्रश्‍न शेतकऱ्‍यांचा होता. खासगी जमिनीवरील आरक्षणामुळे शेतकऱ्‍यांच्या भावना तीव्र होऊन आराखडा रद्दची मागणी जोर धरू लागली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांसमोर हा प्रश्‍न गेल्यानंतर त्याला तात्पुरती स्थगिती मिळाल्याची चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावरही विविध राजकीय पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. त्याला आठवडा उलटला तरी अजूनही अधिकृत स्थगितीचा लेखी आदेश पालिकेला मिळाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे खरोखरच स्थगिती मिळाली की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. तात्पुरती स्थगिती दिली तरी, आराखड्याचे पुढे काय होणार याकडेही शेतकऱ्‍यांचे लक्ष लागले आहे.
----------------
* अशा आहेत हरकती
वाढीव हद्दीच्या विकास आराखड्यात आरक्षित केलेले रस्ते आणि आरक्षणांवरच हरकती दाखल झाल्या आहेत. विशेष करून दफनभूमी, कत्तलखाना, रस्ते, उद्यान, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, स्मशानभूमी, कचरा डेपो आदी आरक्षणांवर सर्वाधिक हरकतींचा समावेश आहे. विशेष करून वारंवार येणाऱ्या पूररेषेतेतील आरक्षणे रद्दची मागणी केली आहे.
----------------
वाढीव हद्दीच्या विकास आराखड्याला स्थगितीची चर्चा सुरू होती. मात्र, पालिकेला अद्याप लेखी आदेश प्राप्त झालेले नाहीत. यामुळे प्रशासनाकडून आराखड्याची पुढील प्रक्रिया सुरू राहणार आहे.
- स्वरुप खारगे, मुख्याधिकारी, गडहिंग्लज नगरपरिषद