कर्मचारी संप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मचारी संप
कर्मचारी संप

कर्मचारी संप

sakal_logo
By

89359
...

कर्मचारी संपात, लोकांचा संताप

टॉऊन हॉलमध्ये कर्मचाऱ्यांची दिवसभर निदर्शने

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १५ : शासकीय, निमशासकीय, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आजच्या दुसऱ्या दिवशीही बेमुदत संपात सहभागी झाले. त्यामुळे महसूल, आरोग्य, जिल्हा परिषदेसह महत्त्‍वाच्या विभागातील कामे प्रलंबित राहीत असल्याने लोकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. आजही ८० हजार कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपात सहभाग घेतला. ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’, जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, अशा जोरदार घोषणा देत आज कर्मचाऱ्यांनी टॉऊन हॉल परिसर दणाणून सोडला.
सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत जिल्ह्यातील वीस हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी टाऊन हॉल येथे ठिय्या मारला. शासकीयसह इतर ९२ विभागांतील कर्मचाऱ्यांनी कामावर न जाता संपात सहभाग घेतला. काल काढलेल्या धडक मोर्चाला कर्मचाऱ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. आजही सकाळी नऊ ते दहापासूनच जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून प्रांत, तहसीलदार, सर्कल, तलाठी कार्यालयातील कर्मचारी कोल्हापुरात दाखल झाले. हातात फलक आणि डोक्यावर ‘जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे’, अशी वाक्ये लिहिलेल्या टोप्या परिधान करून कर्मचारी संपात सहभागी झाले. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही मोठा सहभाग राहिला. त्यामुळे महानगरपालिका ते सीपीआरपर्यंत असणाऱ्या भाऊसिंगजी रस्त्यावर गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी झाली. शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भविष्यात जुनी पेन्शनच तारणार आहे. पण सरकारने ही पेन्शन रद्द केल्यामुळे निवृत्तीनंतर औषधपाणी किंवा प्रपंच कसा चालवायाचा, असाही सवाल या वेळी अनेक कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला.
.....

पूर्वीच्या समितीचे काय झाले?

कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्यावी, यासाठी यापूर्वीही समिती नियुक्त केली होती. आता दुसरी समिती नियुक्त केल्याचे सांगितले जात आहे. याउलट पूर्वीच्या समितीचे काय झाले? त्यांनी कोणता निष्कर्ष काढला, याचे उत्तर द्या. उत्तर नसेल तर जुनी पेन्शन लागू करा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.