बँक-कारखानदार बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बँक-कारखानदार बैठक
बँक-कारखानदार बैठक

बँक-कारखानदार बैठक

sakal_logo
By

जिल्हा बँक- कारखानदारीबद्दल
उलट-सुलट चर्चेमुळे संभ्रम

साखर कारखानदार ः जिल्हा बँकेकडून कारखान्यांना पक्षविरहित अर्थ पुरवठ्याने पाठबळ

कोल्हापूर, ता. १६ ः जिल्हा बँकेकडून सातत्याने साखर उद्योगाची आणि पर्यायाने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाठराखण केलेली आहे. तथापि गेल्या दोन-तीन महिन्यांपासून बँक आणि कारखानदारीबद्दल उलट -सुलट चर्चेमुळे या दोन्ही घटकांची बदनामी होत आहे. जिल्हा बँक सातत्याने कारखानदारीच्या आणि पर्यायाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभी आहे. विशेषत: अलीकडच्या काळात साखर कारखानदारी संकटात असताना जिल्हा बँकेने पक्षविरहित अर्थपुरवठ्यातून केलेले योगदान मोठे असल्याचे पत्रक जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी प्रसिध्दीला दिले आहे.
पत्रकात म्हटले आहे, जिल्हा बँक व कारखानदारीबाबत होत असलेल्या ऊलट-सुलट चर्चेमुळे आम्ही साखर कारखानदारीमध्ये काम करणारे लोक फारच अस्वस्थ आहोत. या पद्धतीची संभ्रमावस्था निर्माण होऊ नये, या भावनेतूनच आम्ही हे स्पष्टीकरण करीत आहोत. बॅंकेकडून साखर कारखान्याना सुलभ पतपुरवठा करणेकामी जे महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यात हंगाम संपल्यानंतर पुढील हंगामाच्या तयारीसाठी बँकेकडून दिले जाणारे कर्ज, पूर्व हंगामी कर्जाविना कारखान्यापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या असत्या पण बँकेने ते होऊ दिले नाही. पुढील हंगामासाठी ऊसतोडणी मजूर आणि तोडणी- वाहतूकदार यंत्रणेसाठी ॲडव्हान्स दिले जाते, त्या कर्जाचीसुद्धा सोय बँकेने साखर कारखान्यांसाठी करून ठेवलेली आहे. दोन वर्षांच्या कोरोना काळात कारखानदारीची घडी विस्कळीत झाली होती, त्यातून मार्ग काढण्यासाठी या सर्व प्रकारचे कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी स्वराज्य बँकेच्या धर्तीवर आत्मनिर्भर योजना तयार केली. वेगवेगळ्या मुदतीची सगळी कर्जे एकत्र करून ती दीर्घ मुदतीची करण्यात आली. त्यामुळे साखर कारखान्यांवरील आर्थिक ताण कमी होवून उस उत्पादकांची उसबिले वेळेत देणे शक्य झाल्याचे या पत्रकात म्हटले आहे.
साखरेस मिळणारा कमी दर, कमी खपामुळे ऊस बिले देण्यासाठी निधी कमी पडेल तेव्हा जिल्हा बँक तो उपलब्ध करून देते. बँकेची कर्जमर्यादा काहीवेळा जादा होते, अशावेळी अन्य बँकांना, कारखान्यांना कर्जपुरवठ्यासाठी बँक स्वतः पुढाकार घेते. अनेक साखर कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पातून विकलेल्या विजेचे पैसे लवकर मिळत नाहीत, त्यावेळीही बँकेची मदत लागते, याचाही विचार आरोप करताना व्हावा, असे या पत्रकात म्हटले आहे.

निवेदनावर हिरण्यकेशी-संकेश्‍वर, अथणी शुगर्स, राजाराम-बावडा, भोगावती, बिद्री, आजरा, इको-केन, रिलायबल शुगर्स, कोरे-वारणानगर, मंडलिक, कुंभी, शरद-नरंदे व अन्नपुर्णा कारखाना प्रतिनिधींच्या सह्या आहेत.
........

बदनामी टाळावी ...

साखर कारखानदारी ही व्यापारी बँकांच्या नकारात्मक यादीमध्ये आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखानदारीला आर्थिक स्थैर्य देण्याची फार मोठी जबाबदारी जिल्हा बँक पार पाडत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सर्वच घटकांनी जिल्हा बँक व त्याला जोडूनच साखर कारखानदारीची होणारी बदनामी टाळावी, असे आवाहनही पत्रकात केले आहे.