
महाडिक-राजाराम
89532
त्यांचा इतिहास
जमिनी लाटण्याचा
अमल महाडिक; ‘राजाराम’च्या सातबाऱ्याची काळजी नको
..............
कोल्हापूर, ता. १६ ः ‘जाईल तिथे जमिनी लाटण्याचा इतिहास असणाऱ्यांनी छत्रपती राजाराम कारखान्याच्या सातबाऱ्याबाबत चिंता करू नये’ अशा शब्दांत माजी आमदार अमल महाडिक यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री. महाडिक यांनी आज हातकणंगले तालुक्यातील रुकडी, माणगाव, चंदूर, मुडशिंगीचा दौरा केला.
यावेळी श्री. महाडिक म्हणाले, ‘कावीळ झालेल्याला सगळे जग पिवळे दिसते तसेच विरोधकांचे झाले आहे. स्वतः स्वार्थाच्या चष्म्यातून पाहत असल्यामुळे त्यांना सगळीकडे स्वार्थ दिसतो. कारखान्याचे सभासद याहीवेळेस त्यांना नाकारणार हे समजल्यामुळे आलेले नैराश्य विरोधक लपवू शकत नाहीत. नैराश्येतूनच ते वक्तव्य करतात.’
‘सातबारा नावावर करतील वगैरे बोलून सभासदांची दिशाभूल करू पाहणाऱ्यांना कदाचित विसर पडला असावा. पण २७ वर्षे आम्ही कारखान्यात सहकार जपण्याचे काम केले. इथल्या प्रत्येक सभासदाला त्याची जाणीव आहे. स्वतःच्या डी. वाय. पाटील कारखान्याचे सभासद रातोरात कमी करणाऱ्यांना आता सभासदांची काळजी वाटत आहे. हे पुतना मावशीचे प्रेम सभासदही ओळखून आहेत. जिल्ह्यातल्या किती सातबारा उताऱ्यांवर तुमची नावे लागली आहेत हे जनतेला ठाऊक आहे. राजाराम कारखान्याचा सुज्ञ शेतकरी सभासद नेहमीच सत्याच्या बाजूने उभा राहिला आणि यापुढेही राहील’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी व्हाईस चेअरमन वसंत बेनाडे, माजी संचालक शिवाजी घोरपडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू मगदूम, बंडू भोसले, माजी पंचायत सदस्य महेश पाटील यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते.