नोकर भरतीचा सामंजस्य करार प्राप्‍त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नोकर भरतीचा सामंजस्य करार प्राप्‍त
नोकर भरतीचा सामंजस्य करार प्राप्‍त

नोकर भरतीचा सामंजस्य करार प्राप्‍त

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून....

नोकर भरतीचा सामंजस्य करार प्राप्‍त;
अटीशर्तींचा समावेश नसल्याने नाराजी

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता.१७ : जिल्‍हा परिषद नोकर भरतीसाठी आयबीपीएस कंपनीची निवड केली आहे. मात्र, परीक्षा घेण्यापासून ते निकालापर्यंतच्या विविध टप्‍प्यांवर जबाबदारीचे विभाजन करणे, कंपनीवरच संपूर्ण परीक्षा प्रक्रियेची जबाबदारी सोपवणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत जिल्‍हा परिषदेने लेखी पत्र दिले होते. मात्र, त्यातील अटीशर्तींचा सामंजस्य करारात समावेश नसल्याने जिल्‍हा परिषदेसमोर पेच निर्माण झाला आहे.
राज्य शासनाने नोकर भरतीची घोषणा केली आहे. नोकर भरतीची बहुतांश जबाबदारी खासगी कंपनीवर सोपविली आहे. शासनाने निश्‍चित केलेल्या कंपनीसोबत करार करून ही नोकरभरती केली जाणार आहे. सुरुवातीला जिल्‍हा परिषदेने टाटा कन्‍सल्टन्‍सी सर्व्हिसेसशी करार केला होता. मात्र, या कंपनीकडे कामे जास्‍त असल्याने त्यांनी जिल्‍हा परिषदेच्या नोकर भरतीस नकार दिला. यानंतर आयबीपीएस कंपनीसोबत करार करण्याचा निर्णय झाला. असे असले तरी भरती प्रक्रियेतील नेमकी कंपनीची व जिल्‍हा परिषदेची जबाबदारी काय, हाच वादाचा विषय बनला आहे. इतर जिल्‍हा परिषदांतही अशीच परिस्‍थिती आहे.
नोकर भरतीसाठी पदनिश्‍चिती करणे, रो‍स्टर मंजुरी, विभाग व पदनिहाय रिक्‍त जागा, आरक्षण या सर्वांची जबाबदारी जिल्‍हा परिषदेने घेतली आहे. मात्र, प्रश्‍‍नपत्रिका काढणे, फॉर्म मागवणे, फी घेणे, निकाल लावणे तसेच पेपर फेरतपासणी, कालमर्यादा या सर्वांबाबत निश्‍चित अशी कार्यपद्धती झालेली नाही. त्यामुळे परीक्षा कंपनी घेणार व वाद निर्माण झाल्यास त्याचा त्रास जिल्‍हा परिषदेला, अशी काहीशी परिस्‍थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच जिल्‍हा परिषदेने जबाबदारीबाबत काही शंका व्यक्‍त केल्या होत्या. तसेच अटीशर्तींचा उल्‍लेख करून त्याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते. मात्र शासनाकडून जो करार प्राप्‍त झाला आहे, त्यात जिल्‍हा परिषदेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जिल्‍हा परिषदस्‍तरावर अनेक प्रश्‍‍न निर्माण झाले आहेत.