जगण्याच्या गदारोळात सहज मिसळता येऊ दे...

जगण्याच्या गदारोळात सहज मिसळता येऊ दे...

फोटो-89738
..........


जगण्याच्या गदारोळात
सहज मिसळता येऊ दे...

‘कुसुमाग्रजांच्या शोधात...सौमित्र’च्या सादरीकरणाने भारावले रसिक

कोल्हापूर, ता. १८ ः ‘... शंभराव्या प्रयोगाची मांड पहिल्यातच बसू दे, फुटू दे तरी इंद्रधनुष्य नवनवीन प्रयोगा-प्रयोगी एक तरी क्षण जिवंत होऊ दे... असू दे भान सतत जागं, माझं मलाच विंगेतून पाहता येऊ दे... घडता घडता नाटक सहज घडू दे... पडदा नेहमी नेमका पडू दे...दिपवू नकोस डोळे अंधारातून प्रकाशात, जगण्याच्या गदारोळात सहज मिसळता येऊ दे... रस्ता आणि पाय मला दोन्ही आवडू देत... शेवटी माझा मला मी पुन्हा एकदा सापडू दे...’ अशी ‘नटराजाप्रती एका नटाची प्रार्थना’ या स्वरचित कवितेने कवी सौमित्र तथा अभिनेते किशोर कदम यांनी ‘कुसुमाग्रजांच्या शोधात... सौमित्र’ या त्यांच्या काव्य-नाट्याची नांदी आज शिवाजी विद्यापीठात केली. सलग ५० मिनिटांच्या सादरीकरणाने उपस्थित रसिकांना खिळवून ठेवले. निमित्त होते शिवाजी विद्यापीठाच्या कवी कुसुमाग्रज स्मृती व्याख्यानमालेचे!
विद्यापीठातील वि. स. खांडेकर भाषाभवनात मराठी अधिविभागातर्फे आयोजित या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, तर मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. रणधीर शिंदे उपस्थित होते. कवी कुसुमाग्रज आणि नाटककार वि.वा. शिरवाडकर या दोघांमधला धागा उलगडण्याचा प्रयत्न करत असतानाच कवी सौमित्र यांनी आपले काव्यविश्व, अभिनय आणि रंगभूमी यांच्याशी त्यांचे नाते जोडून पाहण्याचा प्रयत्न अत्यंत गांभीर्यपूर्वक केला. या सादरीकरणामध्ये कुसुमाग्रजांच्या नाटकांतील काही प्रवेश, काही स्वगतं, काही कुसुमाग्रजांच्या, काही स्वतःच्या तर काही अन्य कवींच्या कवितांचाही समावेश होता. या सर्व बाबींची गुंफण सौमित्र यांनी इतक्या अनोख्या पद्धतीने केली की रसिकांना एका सलग आणि सुसूत्र सादरीकरणाचा आनंद मिळाला. माणसाचं कलेशी, कवितेशी, नाटकाशी असणारं नातं, त्यातून समृद्ध होत जाणारं जगणं आणि त्या जगण्यामध्ये संवेदनशील माणूसपण जपण्याचं महत्त्व उलगडून दाखविणारा असा काव्य-नाट्यानुभव विद्यापीठाच्या मंचावर प्रथमच साकारला गेला.
.........

सादरीकरणासाठी कल्पक वापर

एक खरा अभिनेता केवळ रंगमंचाच्याच नव्हे, तर संपूर्ण प्रेक्षागृहाच्या पोकळीत कसा सामावला जातो, त्या समग्र अवकाशाचा आपल्या सादरीकरणासाठी किती कल्पक वापर करून घेतो आणि त्या अवकाशालाही त्यातील प्रेक्षकांसह आपल्या सादरीकरणाचा कसा भाग बनवून टाकतो, याचा प्रत्ययकारी अनुभव अभिनेता किशोर कदम यांनी या सादरीकरणादरम्यान प्रेक्षकांना दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com