
आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला
फोटो - 89697
--------------
वाशीतील दाम्पत्याचा पोलिसांनी
आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला
मारहाणप्रकरणी संशयितावर कारवाई होत नसल्याने दिला होता इशारा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः वाशी (ता. करवीर) येथील महिलेस मारहाणप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आज पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात आत्मदहन करणाऱ्या दाम्पत्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. अनिता खाणू पुजारी आणि खाणू बापू पुजारी अशी त्यांची नावे आहेत. त्यांना शाहूपुरी पोलिस ठाण्यात नेऊन समज दिली. याबाबतचा गुन्हा करवीर पोलिस ठाण्यात दाखल असल्यामुळे त्यांना मनपरिवर्तन करण्यासाठी तेथे पाठविल्याची माहिती पोलिसांनी दिली. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी सांगितले की, वाशी येथील अनिता पुजारी यांना मारहाण झाली होती. त्यानंतर मारहाण करणाऱ्यावर कडक करावाई करावी, अशी मागणी पुजारी कुटुंबीयांकडून केली होती. मात्र, मनासारखी कारवाई होत नसल्यामुळे दाम्पत्य नाराज होते. दाम्पत्याकडून आज थेट पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक कार्यालयात बंदोबस्त ठेवला होता. दामत्य पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांचे मोबाइल लोकेशन पाहून रमण मळा परिसरातील ड्रीम वर्ल्ड येथे अडवून त्यांच्याकडील रॉकेलचा कॅन काढून घेतला. तेथून त्यांना थेट शाहूपुरी पोलिस ठाण्यात नेऊन त्यांचे मन परिवर्तन केले.
-------------
मारहाण करणाऱ्याला न्यायालयात हजर केल्यानंतर कोठडी मिळाली होती. कोठडीची मुदत संपल्यावर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केल्याची माहितीही पोलिसांनी तक्रारदारांना दिली. दोन्ही बाजूच्या व्यक्तींना करवीर पोलिस ठाण्यात बोलावून समज दिली. संबंधिताला अटक केल्याची माहिती तक्रारदाराला नसल्यामुळे गैरसमज झाला होता.
अरविंद काळे, निरीक्षक, करवीर पोलिस ठाणे
---------------
दरम्यान, तक्रारदार अनिता पुजारी यांनी करवीर पोलिस ठाण्याच्या आवारात माध्यमांशी बोलताना सांगितले की, १५ मार्चच्या रात्री संशयित अबिलास बाळू पुजारी याला अटक करून जामीन मिळाल्यानंतर त्याने ‘माझ्याविरुद्ध तक्रार देतेस काय? तुला पाहून घेतो,’ अशी दमदाटी व शिवीगाळ करून ठार मारण्याचीही धमकी दिली. याची तक्रार करूनही त्याच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे आम्ही आत्मदहन करणार होतो.
.......................