वाचक पत्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाचक पत्रे
वाचक पत्रे

वाचक पत्रे

sakal_logo
By

वाचक पत्रे

फटाक्यांची आतषबाजी
इस्लामपूर शहरात नियमबाह्य फटाक्यांची आतषबाजी होणे ही आता नित्याची बाब झाली आहे. त्यामुळे येथील शुद्ध हवा तर दूषित होतच आहे, परंतु ध्वनी प्रदूषणासारखा गंभीर प्रश्न या परिसरात निर्माण झालेला आहे. नियमबाह्य फटाक्यांची आतषबाजी करणे हा कायद्यानुसार गुन्हा असून नियमाला धाब्यावर बसवून हे कार्य राजरोसपणे शहरात सुरू आहे. या आतषबाजीचा परिणाम ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती व लहान मुलांवर मोठ्या प्रमाणात होत असून प्रशासनाने याबाबतीत डोळ्यांवर काळी पट्टी बांधलेली असल्याचे दिसून येते. फटाके फोडून आनंद व्यक्त करण्याऐवजी पर्यावरण दूषित होण्यापासून कसे वाचविता येईल याचा विचार करणे ही काळाची गरज आहे.
शाम तळोकर, इस्लामपूर
-------------------------------
वाढीव पेन्शन जमा करावी
क्षेत्रिय कर्मचारी भविष्य निर्वाह ईपीएफओ कार्यालय, नवी दिल्ली अंतर्गत येणाऱ्या प्रादेशिक क्षेत्रिय भविष्य निर्वाह, कोल्हापूर येथील भविष्य निधी आयुक्त अमित चौगुले यांनी ईपीएस ९५ पेन्शन धारकांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले आहे. कोल्हापूर भविष्य निर्वाह कार्यालयाअंतर्गत पाच जिल्ह्यांतील दीड लाख पेन्शनधारक रु. १००० इतकी तुटपुंजी पेन्शन घेत आहेत. या पेन्शनधारकांकडून वाढीव पेन्शनसंदर्भात ऑनलाईन फॉर्म भरून घेतले जात आहेत. या पेन्शनरांच्या विविध संघटनांच्या माध्यमातून कमीत कमी रु. ९०००, अधिक महागाई भत्ता याची मागणी होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने दिलेल्या निकालाची तत्काळ अंमलबजावणी करून १ सप्टेंबर २०१४ पूर्वी व नंतर तत्कालीन नियमानुसार पूर्ण वेतनातून फंडात जमा झालेल्या रकमेतून फंड व पेन्शनसाठी रक्कम कपात झालेली आहे. आजतागायत बँक खात्यात रु. १००० पेन्शन जमा होत आहे. त्यांच्याकडून कॉन्ट्रीब्युशन न घेता वाढीव पेन्शनचा लाभ द्यावा. भविष्य निर्वाह आयुक्तांनी या पेन्शनरांच्या संदर्भात गांभीर्याने विचार करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांन्वये महागाई भत्त्यासह उच्चतम् पेन्शनवाढ करून पाडव्याच्या मुहूर्तावर मागील थकबाकीसह उच्चतम पेन्शन वाढ पेन्शनरांच्या बँक खात्यात जमा करावी.
एस. एल. कुलकर्णी, कोल्हापूर
----------------------------------------------
स्री जीवनातील बदल
जगभरातील परिस्थिती वेगाने बदलत आहे. त्याचा परिणाम स्वाभाविकपणे भारतीय समाज व्यवस्थेवर आणि स्रियांवर होताना दिसतो आहे. आजची स्री नोकरी किंवा व्यवसाय करून कुटुंबाच्या चरितार्थाला हातभार लावताना दिसत आहे. त्याचबरोबर गेल्या वीस-पंचवीस वर्षांत नोकरी, व्यवसायात असणाऱ्या स्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. आज स्री नोकरी, व्यवसायात पडल्याने समाज व कुटुंब यांच्या मानसिकतेत बदल होताना दिसतो आहे. त्यामुळे स्री जेथे नोकरी, व्यवसाय करते त्या ठिकाणी सहकार्य, त्यांच्या ये-जा करण्याचे साधन, त्यांना प्रसंगानुसार सवलती, सण-वार, पाहुणे यातील त्यांचा सहभाग वगैरेबाबत प्रशासन अनुकुलता दाखविते. त्यामुळे आजची स्री रांधा, वाढा, उष्टी काढा या पलीकडे जाऊन ती आज अबला राहिली नसून सबला बनली आहे.
रावसाहेब शिरोळे, रुकडी
----------------------------
ढोंगी राजकीय पक्षांमुळे स्थलांतरित धोक्यात
प्रश्न स्थलांतरितांच्या प्रतिष्ठेचाही हे डॉ. कुलदीपसिंह राजपूत यांचे भाष्य (सकाळ ११ मार्च) वाचले. देशातील साठ कोटी आसपास स्थलांतरित आहेत. म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या चाळीस टक्केपेक्षा अधिक लोकांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळत नाही हा पहिला प्रश्न आणि कमी वेतनात दिवसातील दहा तासांपेक्षा अधिक काम करणारे राबणारे हात मिळतात. हा काहींचा मोठा दुर्दैवी फायदा म्हणता येईल. असंघटित क्षेत्रातील लोकांना राबवून घेणे हा काही घटकांचा खरं तर गोरख धंदा आहे; पण काही यंत्रणा इतक्या तयारीच्या आहेत की, या राबणाऱ्या हातांना त्यांच्या घामाचे दाम मिळू देत नाहीत. काही पक्षदेखील परप्रांतियांवर हल्ला करण्यात अथवा त्या हल्ल्यांना प्रोत्साहन देण्यात बऱ्याचदा पुढे-पुढे करतात. एकीकडे प्रखर राष्ट्रवादाचे ढोंग आणि दुसरीकडे आपल्याच इतर प्रांतातील मजुरांवर हल्ले हा दुटप्पीपणा नव्हे काय?
सुनील समडोलीकर, कोल्हापूर
-------------------------------------------