पालकमंत्र्याकडून अंबाबाई मंदिर परिसरातील स्वच्छतागृह कामाची पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालकमंत्र्याकडून अंबाबाई मंदिर परिसरातील स्वच्छतागृह कामाची पाहणी
पालकमंत्र्याकडून अंबाबाई मंदिर परिसरातील स्वच्छतागृह कामाची पाहणी

पालकमंत्र्याकडून अंबाबाई मंदिर परिसरातील स्वच्छतागृह कामाची पाहणी

sakal_logo
By

90019
...

‘पुरातत्व’ च्या अहवालानंतर
मुर्ती संवर्धनाबाबत निर्णय

पालकमंत्री ः अंबाबाई मंदिर परिसरातील स्वच्छतागृह कामाची पाहणी

कोल्हापूर, ता. १९ ः ‘श्री अंबाबाई मुर्ती संवर्धनाबाबत केंद्रीय पुरातत्व विभागातर्फे पुढील आठवड्यानंतर अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्णय घेऊ’, अशी ग्वाही पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे दिली. मंगळवारी (ता. १४) केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंदिरात मुर्तीची पाहणी केली होती. पाहणीनंतर त्यांनी सद्यस्थितीत मुर्ती सुरक्षित असून काही प्रमाणात संवर्धनाची गरज भासल्यास त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना अहवालात देण्यात येतील, असे स्पष्ट केले होते. त्यांच्या अहवालातील मार्गदर्शक सुचनांनुसार मुर्तीची काळजी घेण्यात येईल. तसेच श्रीपुजकांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मंदिर परिसरातील पागा बिल्डिंगमधील सुरू असलेल्या स्वच्छतागृहांचीही पाहणी यावेळी पालकमंत्र्यांनी केली. ते म्हणाले, ‘सध्या तात्पुरत्या स्वरूपात भवानी मंडपासमोरील जागेत स्वच्छतागृहे उभारली आहेत. मात्र मार्चअखेर कायमस्वरूपी चांगल्या दर्जाची स्वच्छतागृहे उभा करू. तसेच भाविकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहांचे दिशादर्शक फलकही उभारले जातील. मंदिर आवारात सभामंडपाचेही काम सुरू करण्यात येणार आहे, ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल. मंदिर परिसरातील काही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतकरी संघासोबतही बोलणी सुरू आहेत, त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ. स्वच्छतागृह उभारण्यात येणारी जागा हेरिटेजमध्ये येते. त्यासाठी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, संभाजीराजे छत्रपती व मालोजीराजे यांनी नेहमीच सहकार्य केले आहे. त्यामुळे भाविकांना कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करण्यात मदत झाली आहे. भक्त निवासाची सुविधा मंदिर आवारातच उपलब्ध करण्यात येईल. अंघोळीनंतर देवीचे दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. देवस्थान समितीच्या महसुल खात्याशी संबधित जमिनीचा प्रलंबित प्रश्नही सोडविण्यात येणार आहे. ’
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उपविभागीय अधिकारी तथा देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, कार्यकारी अभियंता संजय पाटील, उपअभियंता महेश कांजर, देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर, स्थापत्य अभियंता सुयश पाटील, गौरव ठाकरे यांच्यासह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री केसरकर यांनी चर्चा करुन सूचना केल्या.
--------

या सुविधांबाबत केली चर्चा

गरुड मंडपाचे सर्व्हेक्षण, नगारखाना व मणिकर्णिका कुंडाच्या जतन व संवर्धनासाठी विकास आराखडा तयार करणे, दर्शन रांग, स्वच्छतागृहांची उभारणी व नूतनीकरण, भक्तनिवास उभारणी
-------

शेंडापार्कच्या जागेबाबत
मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा बैठक

विविध विकासकामांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली असून शेंडापार्कच्या जागेबाबत पुन्हा एकदा बैठक घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले आहे. शिवाजी पूल येथील विविध मंदिरे, हेरिटेज वास्तूंचे कामही सुरू करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.