राजाराम राजकारण

राजाराम राजकारण

महाडिकांसोबत कोण? याचीच उत्सुकता

‘राजाराम’ चा आखाडा ः ‘गोकुळ’ प्रमाणे मोर्चेबांधणीची विरोधकांची तयारी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १९ ः दोन वर्षांपूर्वी झालेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीनंतर माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता असलेल्या कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत श्री. महाडिक यांच्यासोबत कोण? याचीच उत्सुकता असेल. दुसरीकडे श्री. महाडीक यांचे पारंपरिक विरोधक आमदार सतेज पाटील यांनी मात्र ‘गोकुळ’ प्रमाणचे याठिकाणीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
कारखान्याच्या एकूण सभासदांपैकी ८० टक्के सभासद हे करवीर व हातकणंगले तालुक्यात आहेत. त्यामुळे या दोन तालुक्यात वर्चस्व असलेले नेते कोणासोबत यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. ‘राजाराम’ च्या गेल्या निवडणुकीत आमदार डॉ. विनय कोरे हे श्री. पाटील यांच्यासोबत होते. यावेळी मात्र डॉ. कोरे हे वेगळी भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोणाशीच वाद नको म्हणून गेल्यावेळी तटस्थ राहीलेले इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे हे यावेळी श्री. महाडिक यांच्या बाजूने उघड दिसण्याची शक्यता आहे. आजच माणगांव (ता. हातकणंगले) येथे झालेल्या सत्ताधाऱ्यांच्या सभेतील त्यांची उपस्थिती बरेच काही सांगून जाते. गेल्या निवडणुकीत कोणासोबतच नसलेले आमदार राजूबाबा आवळे व त्यांचे वडील जयवंतराव आवळे हे यावेळीही त्याच भूमिकेत असतील.
डॉ. कोरे यांच्यासह आमदार हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, श्री. नरके आदी नेते व प्रमुख कार्यकर्ते ‘गोकुळ’ च्या मैदानात श्री. पाटील यांच्यासोबत होते. आता श्री. पाटील यांच्यादृष्टीने ‘राजाराम’ महत्‍वाचा आहे. त्यातून ते ‘गोकुळ’ प्रमाणेच मोट बांधण्याचा विचार करत आहेत. पण यापैकी त्यांच्यासोबत कोण असेल यावर निकालाचे चित्र अवलंबून असेल.
............


पी. एन. पाटील गट नाराज

करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘कुंभी’ ची निवडणूक लढवली. ‘कुंभी’ च्या गेल्या निवडणुकीत कोणतीही भूमिका न घेतलेल्या सतेज पाटील यांनी यावेळी ‘कुंभी’ चे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांच्या बाजूने उघड भूमिका घेतली. परिणामी ‘करवीर’ मधील पी. एन. यांच्यासह त्यांचा गट नाराज आहे. ‘राजाराम’ च्या गेल्या निवडणुकीत पी. एन. हे श्री. महाडीक यांच्यासोबतच होते, यावेळीही ते अधिक ताकदीने उतरण्याची शक्यता आहे. त्याची झलक ‘कुंभी’ च्या निकालादिवशीच त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या व्हॉटसअप ग्रुपवर पहायला मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com