अभ्यासाचा दृष्टीकोन बदला (पुरवणी लेख) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभ्यासाचा दृष्टीकोन बदला (पुरवणी लेख)
अभ्यासाचा दृष्टीकोन बदला (पुरवणी लेख)

अभ्यासाचा दृष्टीकोन बदला (पुरवणी लेख)

sakal_logo
By

स्वयंअध्ययनाचा ध्यास
होईल परिपूर्ण अभ्यास

इंट्रो
अभ्यास कसा करायचा हा शालेय विद्यार्थ्यांना आणि पालकांना सतत भेडसावणारा प्रश्न आहे. पाठ्यपुस्तक वाचणे, सराव चाचण्या सोडवणे, शिकवणीच्या सरांनी दिलेल्या नोट्स वाचणे असेच सध्याच्या अभ्यासाचे ढोबळमानाने स्वरूप आहे. मात्र जोपर्यंत समजावून घेणे आणि स्वतःच्या शब्दांत मांडणी करणे ही प्रक्रिया होत नाही, तोपर्यंत अभ्यास होणार नाही. यासाठी या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी अभ्यासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे.
-----------------

‘मुले अभ्यास करतात; पण जास्त गुण मिळत नाहीत’, ‘तो सतत अभ्यास करतो पण त्याच्या लक्षातच येत नाही’, ‘सराव चाचणीत चांगला पेपर सोडवला पण वार्षिक परीक्षेत त्याच्या लक्षातच राहिले नाही’, असे अनेक प्रश्न घरोघरी नित्याचेच झाले आहेत. पालकांच्या या तक्रारींची समाधानकारक उत्तरे देणारे शिक्षकही दुर्मिळ झाले आहेत. कारण आपल्याकडे अध्यापन आणि अध्यायन यांची पद्धतच बदलून गेली आहे. अध्यापनाच्या विविध प्रयोगांमुळे अध्ययन जरी रंजक झाले असले तरी त्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचीही काही भूमिका असते, हा विचारच मागे पडला आहे. भरपूर प्रकारचे ‘स्टडी मटेरिअल’ आणि त्याची घोकंपट्टी करणारे विद्यार्थी असे चित्र सर्वत्र दिसते. त्यामुळे शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला असला तरी अभ्यास कसा करायचा हा प्रश्न आजही अनेक पालकांना आणि विद्यार्थ्यांना भेडसावणारा आहे. काळाच्या ओघात अध्ययनाची अनेक साधने आणि पद्धती विकसित झाल्या. मात्र यामध्ये विद्यार्थ्यांना एखाद्या पाठ्यक्रमातील भाग नोट्सच्या माध्यमातून तयार दिला जातो. काही वेळा परीक्षेपुरते एवढाच दृष्टिकोन समोर ठेवून अध्ययन केले जाते. या सर्वांमुळे विद्यार्थ्यांना आयते साहित्य मिळाले की मगच अभ्यास करायचा, अशी सवय लागते. याचा त्रास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात होतो. यासाठी सर्वात आधी विद्यार्थ्यांना वाचण्याची सवय लावणे आवश्यक आहे. आपण स्वतःहून काही वाचावे असे वातावरण त्यांच्या अवतीभवती नाही. शाळा, कुटुंबात त्यांना तुम्ही हे वाचा हे सांगणारेही कोणी नाही. शाळेत वाचनाचा तास नाही आणि कोणी तरी वाचत बसले आहे, असे दृश्‍यही घरात त्यांना दिसत नाही. त्यामुळे आपण स्वतःहून काही तरी वाचायचे असते आणि त्यातून अनेक गोष्टी समजावून घ्यायच्या असतात हे त्यांना सांगितले पाहिजे.
सध्या विद्यार्थ्यांची वाचनाची सवय कमी झाली आहे. डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे त्यांना प्रत्येक गोष्ट दृकश्राव्य पद्धतीने दाखवली की, लगेच लक्षात येते. ही गोष्ट चांगली आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या आकलनाने एखादी गोष्ट समजावून घेताना अडचणी येतात. यासाठी त्यांना रोज एका जागी बसून वाचण्याची सवय लावली पाहिजे. जे वाचले त्याचे आकलन किती झाले हे पाहण्यासाठी त्यांना जे कळाले ते लिहून काढले पाहिजे. त्यातून त्यांचे आकलनही लक्षात येईल. अभ्यासक्रमातील विषय विद्यार्थ्यांनी समजावून घेतले पाहिजेत. त्यामुळे लेखन आणि वाचन या माध्यमातूनच विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययन केले पाहिजे. विद्यार्थी लेखन कौशल्यात मागे पडण्याची शक्यता आहे. ही कौशल्ये विकसित होण्यासाठीही स्वयंअध्ययनाची आवश्यकता आहे.
अभ्यास केवळ चार भिंतीत होतो असे नाही. तर त्यांना व्यावहारिक कौशल्यांमधूनही अनेक गोष्टींचे आकलन होत असते. घरातील वस्तू आणि त्याचा उपयोग समजावून घेतला पाहिजे. उदा. घरातील फ्रिज कसे काम करतो, त्यामध्ये उपयोगात आणलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान काय आहे या गोष्टींची माहिती मुलांना घरात झाली पाहिजे. घरातील वीज कशी प्रवाही असते, स्विच दाबले की लाईट का लागते, या सर्वांचे आकलन विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना बँकांचे व्यवहार कसे चालतात, महापालिकेचे काम काय असते, या सर्व गोष्टींची माहिती त्यांना या माध्यमातून होते. विद्यार्थ्यांना महिन्यातील एक दिवस ग्रंथालयात नेले पाहिजे. येथे त्यांना विविध लेखाकांच्या साहित्याचा परिचय करून दिला पाहिजे. चांगल्या वक्त्यांचे भाषण ऐकवले पाहिजे. यासाठी यु-ट्यूबसारखी माध्यमे महत्त्वाची ठरतात.

ःःःः...तर गुण वाढतीलच
विद्यार्थी जर स्वतःच्या मानाने आणि समजावून घेऊन अभ्यास करू लागला तर त्याचे गुण वाढतीलच; पण त्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. जो त्याला पुढील आव्हानांना यशस्वीपणे तोंड देण्यासाठी उपयोगात येईल. अभ्यास हे केवळ शैक्षणिक काळातील काम नाही तर चांगले जीवन जगण्यासाठी केलेली ती साधना आहे. अभ्यासाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन आपण आत्मसात केला पाहिजे.