
इचल: दीड कोटी निधी मंजूर
भगतसिंग जलतरण तलाव
दुरुस्तीसाठी दीड कोटी निधी
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता.२२ ः शहरातील महापालिकेच्या शहीद भगतसिंग जलतरण तलावाच्या दुरुस्तीसाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मंजूर झाला आहे. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) अंतर्गत हा निधी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंजूर केला आहे. याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी पाठपुरावा केला.
शहरात दोन जलतरण तलाव आहेत. घोरपडे नाट्यगृहाजवळ शंकरराव पुजारी जलतरण तलाव हा ऑलिंपिक दर्जाचा आहे, तर शहीद भगतसिंग उद्यानात असलेला जलतरण तलाव गेल्या अनेक दिवसांपासून दुरुस्तीअभावी बंद आहे. त्यामुळे या तलावात पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसह जलतरणपटूंची गैरसोय होत होती. ही बाब खासदार धैर्यशील माने व शिवसेना जिल्हाप्रमुख माने यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर स्वतः जिल्हाप्रमुख माने यांनी या तलावाला भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी जलतरण सुस्थितीत येण्यासाठी पालकमंत्री केसरकर यांच्या माध्यमातून आवश्यक निधी देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली होती. याबाबतचा प्रस्ताव सादर केल्यानंतर या तलावाच्या दुरुस्तीसाठी तब्बल दीड कोटीचा निधी पालकमंत्र्यांनी मंजूर केला आहे. लवकरच याबाबतच्या कामाला सुरुवात होणार असून, नजीकच्या काळात पुन्हा नागरिक आणि जलतरणपटूंसाठी हा जलतरण तलाव खुला होईल, असे माने यांनी सांगितले.
......................