
गर्भाशय मुखाचा कॅन्सर लस
गर्भाशय कर्करोग प्रतिबंध
मोफत लसीकरण शिबिर आज
कोल्हापूर, ता. २३ ः गर्भाशय मुखाचा कर्करोग हा स्तनांच्या कर्करोगाखालोखाल महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे. ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) नामक विषाणूमुळे हा कर्करोग होतो. जगातील कर्करोगाच्या अनेक प्रकारांपैकी कारण माहिती असलेला बहुदा हा एकमेव कर्करोग आहे. दरवर्षी भारतातील सुमारे एक लाख २२ हजार ८४४ महिलांना या कर्करोगाचे निदान होते. त्यांपैकी सुमारे ६७ हजार ४७७ महिलांचा या कर्करोगामुळे मृत्यू होतो. १५ वर्षांवरील वयोगटातील महिलांना या कर्करोगाचा धोका सर्वाधिक आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी एचपीव्ही लस दिली जाते. प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असलेला हा एकमेव कर्करोग आहे. ही लस येथील हिरकणी फाउंडेशनतर्फे मोफत दिली जाणार आहे.
९ ते २० या वयोगटातील मुलींसाठी सध्या ही लस उपलब्ध असून गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर प्रतिबंध लसीकरण शिबिर आयोजित केले आहे. कॅन्सर पेशंट ऍड असोशियन इंडिया डॉ. धनंजया सारनाथ ( एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर, रिसर्च स्टडीज ॲडिशनल प्रोजेक्ट) यांच्या विशेष सहकार्यातून ही लस मोफत उपलब्ध होत आहे. कोल्हापूर मेडिकल असोसिएशन हॉलमध्ये शुक्रवारी (ता. २४) सकाळी ८ ते 2 या वेळेत हे लसीकरण होणार आहे. यशोमंगल क्लिनिकच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राधिका जोशी यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. तसेच पिंक इंडिया टीमने जनजागृती केली आहे. ही लस घेण्यासाठी पालकांची पूर्वपरवानगी व मुली आणि पालकांचे आधारकार्ड सोबत असणे आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी सनराइज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर, हिरकणी फाउंडेशनच्या जयश्री शेलार, डॉ. वैदेही टोके, भावना शर्मा, प्रिया प्रसाद यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन फाउंडेशनतर्फे केले आहे.