
टुडे मनपा
लोगो - महापालिका
अंदाजपत्रक
90985
कोल्हापूर : महापालिकेचे अंदाजपत्रक प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे सुपूर्द करताना अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व अन्य अधिकारी.
पाणीपुरवठा विभाग वापरणार सौर उर्जा
आर्ट गॅलरी, चार्जिंग स्टेशन, दोन रोपवाटीका, रोड सेफ्टीचा अभ्यासक्रम करणार सुरू
कोल्हापूर, ता. २३ : वीज खर्च वाचवण्यासाठी पाणी उपसा तसेच जलशुध्दीकरण केंद्रातील पंपांसाठी सौर उर्जा प्रकल्प, राजारामपुरीतील जगदाळे हॉल येथे नवीन आर्ट गॅलरी, दोन रोपवाटीकांची निर्मिती, केएमसी कॉलेजमध्ये रोड सेफ्टी अभ्यासक्रम अशा वैशिष्ट्यांचा समावेश महापालिकेच्या आज सादर झालेल्या अंदाजपत्रकात करण्यात आला आहे. याशिवाय हेरिटेज वास्तू रोषणाईने उजळण्यासाठी, महिला संचलित मार्केट सुरू करण्याबरोबर फिजीओथेरपी सेंटर अद्ययावत करण्याबरोबरच दोन कोटी खर्च करून शहरात सात ठिकाणी हायजेनिक स्वच्छतागृहे उभारण्याची तरतूदही केली आहे.
महापालिकेने अंदाजपत्रकात विविध क्षेत्रानुसार १४ विभाग करण्यात आले आहेत. त्यामध्ये नवीन योजनांबरोबरच काही सेवा बळकटीकरण सुचवले आहे. उपसमितीने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे अंदाजपत्रक सादर केले. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, वित्त अधिकारी सुनील काटे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टीना गवळी, शिक्षण समिती प्रशासनाधिकारी शंकर यादव, आरोग्याधिकारी डॉ. रमेश जाधव, उपशहर अभियंता नारायण भोसले, मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे आदी उपस्थित होते.
अंदाजपत्रकातील विविध कामांसाठी केलेली तरतूद
बांधकाम
नवीन प्रशासकीय इमारतीसाठी दोन कोटी
एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील रस्त्यांच्या स्टॉर्म वॉटर कनेक्टीव्हिटीसाठी ५० लाख. कळंबा साईमंदिर ते साळोखेनगर पाण्याची टाकीपर्यन्त मॉडेल रोडसाठी २ कोटी ५० लाख. सिग्नल सिंक्रोनायझेशन, ट्रॅफिक बूथसाठी १ कोटी २५ लाख. महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्राथमिक कामासाठी २ कोटी. वाणिज्य व औद्योगिक पाणी कनेक्शनसाठी पाणीपुरवठा रिडींग एएमआर मशिन. गुंठेवारी प्रकरणे नियमितीकरणासाठी ऑगस्टपर्यंत मुदतवाढ.
पाणीपुरवठा
एनर्जी ऑडीटही करणार
वॉटर ऑडीट करुन वितरण व्यवस्थेमधील त्रुटी शोधणे, खराब पाईपलाईन बदलणे, पंपींग मशिनरीचा पूर्ण क्षमतेने वापर करणे या उपाययोजना होणार. एनर्जी ऑडीटही करणार. पंपींग स्टेशन, पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रात सौर उर्जेवरील पंपासाठी एक कोटी २० लाख.
पर्यटन
हेरिटेज वास्तुंना रोषणाई
सरस्वती चित्रमंदिरानजीकचे बहुमजली पार्कींगची या वर्षामध्ये उर्वरित कामे पूर्ण करणार. रंकाळा तलाव परिसराची कामांची पुर्तता. हेरिटेज वास्तुंचे संवर्धन, विद्युत रोषणाई प्रस्तावित केली आहे. हेरिजेट वॉक घेणे प्रस्तावीत आहे. यासाठी ५० लाखांची तरतूद. खासबाग मैदान येथे कुस्ती विषयक माहिती, प्रात्यक्षिक, मर्दानी खेळांचे प्रदर्शन, प्रसिध्द वास्तू, कोल्हापूरची वैशिष्ट्यांची माहिती देणार.
शहर विकास
सुसज्ज आर्ट गॅलरी, विसर्जनासाठी डेक
केशवराव भोसले नाटयगृह दुरुस्तीसाठी स्वनिधीमधून ४० लाख. राजारामपुरी जगदाळे हॉल येथे सुसज्ज आर्ट गॅलरी करण्यासाठी २० लाख. राष्ट्रीय महामार्गालगत ट्रक टर्मिनससाठी ५० लाख. उद्यानांचा विकास, हरित पट्टे विकास, नवीन झाडे, अर्बन फॉरेस्ट्रीसाठी वित्त आयोग व स्वनिधीतून ४ कोटी. रंकाळा जाऊळाचा गणपती चौकानजीक पार्किंग विकसित करणार. हुतात्मा पार्क पूल व संभाजी पूल दुरुस्ती व सौंदर्यीकरणासाठी ५३ लाख. ५४ उद्यानांसाठी सिध्दाळा गार्डन व महावीर गार्डन येथे रोपवाटीकांसाठी २० लाख. इराणी खण क्र.२ स्वच्छ करणे व विसर्जनासाठी डेक तयार करण्यासाठी ५० लाख. छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये महिला संचलित मार्केटसाठी १ कोटी. मध्यवर्ती नियंत्रण कक्षाद्वारे सेवा सुविधांच्या नियंत्रणासाठी १ कोटी.
सामाजिक
रोड सेफ्टी अभ्यासक्रम, मैदानावर फ्लड लाईटस्
केएमसी कॉलेजमध्ये रोड सेफ्टी अभ्यासक्रमासाठी १० लाख. पंचगंगा स्मशानभूमी येथे शेड व अन्य दुरुस्तीसाठी ५४ लाख, रिटेनिंग वॉल दुरुस्तीसाठी १५ लाख मंजूर. विस्तारासाठी एक कोटी ५० लाख. हॉकी स्टेडियम गाळे विकसित करणे, मैदानावर फ्लड लाईटस् बसविण्यासाठी १ कोटी ७० लाख. भिंती रंगवा अभियानासाठी १५ लाख. ज्येष्ठ नागरिकांसाठी वाळके हॉस्पिटलनजीक, मुक्त सैनिक वसाहत, साकोली कॉर्नर, मनोरमा नगर येथे रिडींग रुम. हुतात्मा गार्डन येथे शहरातील स्वातंत्र्य सैनिकांची माहिती.
आरोग्य
फिजिओथेरपी सेंटर्सचे अद्ययावत
एम.आर. देसाई व डि.एन.शिर्के ही दोन फिजिओथेरपी सेंटर्स अद्ययावत. सावित्रीबाई फुले रुग्णालय व पंचगंगा रुग्णालयाकडील श्रेणीवाढ, सुधारणा व आवश्यक औषधे, साहित्यासाठी १ कोटी.
घनकचरा व्यवस्थापन
रोड स्विपिंगच्या आठ मशिन
फायर स्टेशन कावळा नाका, राजाराम गार्डन, पंचगंगा घाट, खराडे कॉलेजजवळ, दसरा चौक मैदान, बिंदू चौक पार्किंग परिसर, हुतात्मा पार्क येथे हायजेनिक स्वच्छतागृहांसाठी दोन कोटी. १६९ टिपरवर क्यु आर कोड मॉनेटरींग सिस्टीम. रोड स्विपिंगच्या आठ मशिनसाठी ४ कोटी ४०लाख.
पर्यावरण
धुलीकणांवर नियंत्रण, लॉन विकसित करणार
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत पाच इलेक्ट्रीक बस, २४० किलो वॅट क्षमतेचे दोन चार्जिंग स्टेशनसाठी ५ कोटी ७५ लाख. धुलीकणांवर नियंत्रणासाठी वॉटर फाऊंटनसाठी १ कोटी. पंचगंगा स्मशानभूमी, कसबा बावडा स्मशानभूमी येथे विद्युत दाहिनीसाठी २ कोटी ९० लाख. टेंबलाई उड्डाणपूल येथे रस्त्यालगत लॉन विकसित करणे कुंडया ठेवणे, संरक्षक कठडयास व्हर्टीकल गार्डनसाठी ६५ लाख. बेलबाग, साळोखेनगर, गायकवाड पुतळा, आधार हॉस्पिटल जवळ लॉन लावणे, पदपथ, जैवविविधता विकसित करणे, वृक्षारोपणासाठी १ कोटी. महापालिका इमारती व दवाखाना येथे सौर उर्जा यंत्रणा बसविण्यासाठी ३० लाख.
दिव्यांग
वस्तूंचे विक्री केंद्र
नवीन आर्थिक वर्षामध्ये दिव्यांग भवन पुर्ण करणार. दिव्यांगनिर्मित वस्तूंचे विक्री केंद्र उभारणार. संवेदना उद्यान महावीर उद्यानात विकसित करण्यासाठी ५० लाख. ज्येष्ठ नागरिकांसाठी डे-केअर सुविधेसाठी दोन कोटी.
अग्निशमन
डिजिटल मोबाईल रेडिओ प्रणाली
अरुंद रस्ते, गावठाण, झोपडपट्टीसाठी नवीन छोटी वाहनांसाठी १० लाख. ताराराणी फायर स्टेशन नुतनीकरणासाठी १ कोटी. टर्न टेबल लॅडरच्या बाऊझर खरेदीसाठी ७५ लाख. मिनी फायर टेंडर खरेदीसाठी ४३ लाख ४७ हजार. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीसाठी डिजिटल मोबाईल रेडिओ प्रणाली बसविणार.
ई-गर्व्हनन्स
कॉम्पॅक्टर सिस्टीम
अद्ययावत ई-गर्व्हनन्स सिस्टीम विकसीत करणार. सीएसआर मधून मिळकत कर संगणक प्रणाली विकसीत करणार. नवीन आर्थिक वर्षाची कर देयके नवीन संगणक प्रणालीतून येणार. रेकॉर्ड व अन्य विभागाकडील दस्तऐवज, रजिस्टर जतन करण्यासाठी कॉम्पॅक्टर सिस्टीम बसविणार.
महिला बालकल्याण
कायमस्वरुपी विक्री केंद्रे
महिला, मुली व बालकांकरीता विविध कल्याणकारी योजनांसाठी ३ कोटी ८० लाख. शहरातील महिला बचत गटांच्या वस्तुंसाठी कायमस्वरुपी विक्री केंद्रे. तीन हिरकणी कक्ष, छत्रपती ताराराणी कन्या सुविद्या योजने अंतर्गत ३०० मुलींकरीता आर्थिक मदत योजना. सानेगुरुजी वसाहत सूर्यवंशी कॉलनीत महिलांकरिता व्यायामशाळेसाठी १२ लाख. मुक्त सैनिक वसाहत येथे महिला, लहान बालकांसाठी आनंदवाचन कक्ष. बंद शाळेतील इमारतीमध्ये महिलांसाठी स्टडी रुम.
क्रीडा
शुटींग रेंजसाठी नवीन इमारत
बालिंगे येथे इनडोअर स्टेडियममध्ये ४ बॅडमिंटन कोर्ट, ४ टेबल टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, व्हॉलिबॉल कोर्ट, स्क्वॅश कोर्ट, कॅरम, बुध्दीबळ, ज्युदो-कराटे, चेंजिंग रुम, प्रसाधनगृहे, प्रशासकीय कार्यालय व इतर अनुषंगिक सुविधांसाठी १० कोटी. दुधाळी शुटींग रेंजशेजारी २५ व ५० मीटर रेंजची नवीन इमारत व आधुनिक साहित्यासाठी ५ कोटी. सासने ग्राऊंड बॅडमिंटन हॉल दुरुस्तीसाठी २५ लाख. अंबाई जलतरण तलाव सुधारणेसाठी २५ लाख. कुस्ती, फुटबॉल व अन्य क्रीडा बाबींसाठी उत्तेजन देण्यासाठी दोन कोटी ५० लाख.