
उद्घाटन ‘जल जीवन’चे, त्रास अधिकाऱ्यांना
लोगो- जिल्हा परिषद
-
उद्घाटन ‘जल जीवन’चे, त्रास अधिकाऱ्यांना
प्रोटोकॉलचे उल्लंघन होत असल्याची तक्रार; योजनेच्या श्रेयवादासाठी लोकप्रतिनिधींमध्ये चढाओढ
सदानंद पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.२५ : गावागावांत जल जीवन मिशन योजनेंतर्गत घेतलेल्या पाणी योजनांच्या उद्घाटनांचा धडाका सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय व्यक्तीला आपणास या उद्घाटनाची संधी मिळावी, अशी अपेक्षा आहे. मात्र, लोकप्रतिनिधी एका पक्षाचा आणि गावातील सत्ता दुसऱ्याच पक्षाची, असे चित्र आहे. पाणी योजनेच्या उद्घाटनाला ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींना बोलावत नसल्याबद्दल अधिकाऱ्यांकडे तक्रारी येत आहेत. त्यांची दखल ग्रामपंचायती घेत नसल्याने, या सर्वाचा राग मात्र अधिकाऱ्यांवर निघत आहे. आता सक्तीनेच उद्घाटन कार्यक्रम पत्रिकेत लोकप्रतिनिधींचे नाव घालायची नवी जबाबदारी पाणीपुरवठा विभागावर येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील १२०० गावांत जल जीवन मिशन योजनेतून पाणी योजना घेतल्या आहेत. यासाठी एक हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची तरतूद केली आहे. आतापर्यंत ४५ गावांच्या योजना पूर्णही झाल्या आहेत, तर अनेक गावांत पाणी योजनांची कामे गतीने सुरू आहेत. सहा महिन्यांपासून जल जीवन मिशनचे काम प्रत्यक्ष गावांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पहिल्यांदाच पाणी योजनांसाठी भरपूर निधी आला आहे. पाणी योजना हा गावांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे या योजना आपणच मंजूर केल्या, हे दाखवण्यासाठी सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे.
जल जीवन मिशन ही केंद्र शासनाची योजना आहे. सर्व कुटुंबांना घरोघरी नळाने मुबलक व स्वच्छ पाणी देण्याचा केंद्रांचा संकल्प आहे. त्यामुळे सर्वच गावांना ही योजना मंजूर केली आहे. वास्तविक या पाणी योजनांचा व लोकप्रतिनिधींचा फारसा काही संबंध नाही. मात्र, सध्या श्रेयवादाचे राजकारण चांगलेच तापल्याने सर्वच लोकप्रतिनिधींनी जल जीवन योजनेत लक्ष घातले आहे. योजना मंजूर झाल्यानंतर ती कोणत्या ठेकेदाराला द्यायची, यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी कंबर कसली आहे. तसेच गावाला मंजूर झालेल्या योजनांचे उद्घाटन आता कळीचा मुद्दा बनला आहे. पाणी योजनेच्या उद्घाटनाला सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना बोलाविण्याचा आग्रह धरला जात आहे. मात्र, गावागावांत काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असल्याने ग्रामपंचायती सत्ताधाऱ्यांना डावलून उद्घाटन कार्यक्रम घेत आहेत. ग्रामपंचायती उद्घाटनाला बोलावत नसल्याचा राग अधिकाऱ्यांवर निघत असल्याचे चित्र आहे.
....
कोट
जिल्ह्यातील खासदार, आमदारांना पाणी योजनेच्या उद्घाटनासाठी बोलावणे आवश्यक आहे. त्याबाबतचे पत्र सर्व गट विकास अधिकारी, उपअभियंता यांना दिले आहे. तसेच उद्घाटन पत्रिकेत खासदार, आमदारांची नावे घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाणी योजनांचे उद्घाटन हा सरकारी कार्यक्रम असत नाही. ग्रामपंचायतीकडून त्याचे आयोजन केले जात असल्याने विभागाला मर्यादा आल्या आहेत.
अशोक धोंगे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा
.............................