
बांधकाम क्षेत्राला चालना, ग्राहकांना दिलासा
गृहस्वप्न आवक्यात
कोल्हापूर ः कोरोनाच्या दोन वर्षांनंतर बांधकाम क्षेत्र आता काही प्रमाणात पूर्वपदावर आले आहे. ते लक्षात घेऊन यावर्षी रेडीरेकनरच्या (बाजारमूल्य) दरामध्ये वाढ करण्यात येऊ नये, अशी मागणी क्रिडाई महाराष्ट्र, कोल्हापूर आणि असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजिनिअर्सने राज्य सरकारकडे केली होती. शासनाच्या निर्णयामुळे कोल्हापुरातील बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल. त्याचवेळी ग्राहकांचे गृहस्वप्न आवाक्यात असणार आहे.
रेडीरेकनरचा दर ‘जैसे-थे’ ठेवण्याचा निर्णय कोल्हापूरच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. शहराची हद्दवाढ झाली नसल्याने सध्या जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यात रेडीरेकनरचे दर वाढले असते, तर सर्वसामान्यांना घर, जमीन घेणे अडचणीचे ठरले असते. शहरातील गुंतवणुकीवर परिणाम झाला असता.
- अजय कोराणे, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजिनिअर्स
रेडीरेकनरचे दर वाढणार नसल्याने कोल्हापूरच्या बांधकाम क्षेत्राला आणखी गती येण्याची शक्यता आहे. गृहस्वप्न साकारण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा आहे.
- के. पी. खोत, अध्यक्ष, क्रिडाई कोल्हापूर.
बँकांनी रेपो रेटमध्ये वाढ केल्याने व्याजदराचा टक्का वाढला आहे. रेडीरेकनरमध्ये वाढ झाली असती, तर त्याचा भार ग्राहकांवर पडला असता. त्यासह बांधकाम क्षेत्राला काही प्रमाणात फटका बसला असता. मात्र, दर वाढणार नसल्याने दिलासा मिळाला आहे.
- महेश यादव, माजी अध्यक्ष, क्रिडाई कोल्हापूर
जिल्ह्यातील मुद्रांक शुल्क विभागाचे आर्थिक वर्षातील महसुलाचे १२० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील रेडीरेकनरच्या दरामध्ये कोणताही वाढ नाही.
- मल्लिकार्जुन माने, सहजिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी