
अंबाबाई मंदिर गर्दी
सलग दुसऱ्या आठवड्यात
अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी
कोल्हापूर, ता. १६ ः सलग दुसऱ्या आठवड्यात आलेल्या सलग सुट्यामुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रविवारी गर्दी केली. गेले सलग दोन दिवस ही गर्दी कायम राहिली.
वाढत्या उन्हाच्या कडाक्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दर्शनरांगेवर मंडप, मंदिर आवारात ध्यान तसेच आराम करण्यासाठी समितीने मंडप उभारला आहे. त्यामुळे भाविकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. दर्शनमार्गावर मॅट असले तरीही गर्दी वाढल्यानंतर दर्शनरांग जुना राजवाडा पोलिस ठाण्यापर्यंत जाते. येथे मॅट नसल्याने उन्हाचे चटके सहन करतच दर्शनासाठी भाविकांना थांबावे लागते.
दरम्यान, जोतिबा दर्शनासाठी आलेल्या बहुंताश भाविकांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचेही दर्शन घेतले. यामध्ये कर्नाटकच्या भाविकांची संख्या मोठी होती. परगावाहून आलेल्या भाविकांनी भवानी मंडप, अंबाबाई मंदिर परिसरात सावली शोधत घरून आणलेल्या शिदोरीचा आस्वाद घेतला. सुटीचा आज शेवटचा दिवस असल्याने पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या. दुपारनंतर मात्र गर्दी ओसरली.