अंकासाठी शिवजयंती

अंकासाठी शिवजयंती

फोटो - ९७८९४
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शहरासह जिल्ह्यात शनिवारी जल्लोषात साजरी झाली. त्यानिमित्त विविध तालमी आणि मंडळांतर्फे काढण्यात आलेल्या जंगी मिरवणुका
आणि रोषणाई पाहण्यासाठी महाद्वार रोड शिवभक्तांच्या गर्दीने असा फुलून गेला होता. (बी. डी. चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा )

अवघे शहर झाले शिवमय!
शिवजयंती जल्लोषात साजरी; शिवकालीन युद्धकलेचाही थरार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ : स्फूर्तीदायक शिवगीते, लेझर किरणांचा झगमगाट व शिवछत्रपतींचा जयघोष अशा जल्लोषी वातावरणात शिवजयंतीचा उत्साह आज टिपेला पोचला. हलगी, घुमकं व कैताळच्या ठेक्यावर महिलांनी लेझीमची प्रात्यक्षिके सादर करत शिवभक्तांची मने जिंकली. शिवकालीन युद्धकलेच्या थराराने उपस्थित भारावून गेले.
पारंपरिक पद्धतीने शिवजयंतीचा सोहळा शहर परिसरात झाला. गल्ली-बोळांत लावलेल्या भगव्या पताका व भगवे झेंडे यामुळे वातावरण शिवमय झाले होते. शुक्रवारी रात्रभर जागून शिवभक्तांनी छोटे मंडप उभारले होते, तर ग्रामीण भागातील शिवभक्त शिवज्योत आणण्यासाठी किल्ले पन्हाळगडावर रवाना झाले होते.
सकाळी पोवाड्यांचे सूर वातावरणात स्वार होताच चौकाचौकांत उत्साह निर्माण झाला. हातात भगवे झेंडे, डोक्याला भगव्या पट्ट्या बांधून बालचमू शिवजयंतीसाठी सज्ज झाला.
दहा वाजून दहा मिनिटांनी शिवजन्मकाळ सोहळ्यासाठी पारंपरिक वेशभूषेत महिला आल्या. त्यांच्या हस्ते पाळणा पूजन झाले. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या मिरवणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या. मोठ्या आवाजाच्या ध्वनीक्षेपकाची दुपारीच चाचणी झाली. दुपारी तीन वाजता मिरजकर तिकटी येथे शिवभक्तांची गर्दी झाली. मिरवणुकीसाठी मंडळे रांगेत आल्यानंतर आवाजाची तीव्रता अधिकच वाढली. पोलिस बंदोबस्तात मिरवणुका हळूहळू पुढे जाऊ लागल्या. उपनगरांतील बालचमूने सकाळी शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन केले. सायंकाळी त्यांनी हातात भगवे ध्वज घेऊन परिसरात फेऱ्या मारल्या.

मोठा बंदोबस्त
यंदा एकामागोमाग एक मंडळांच्या मिरवणुका होत्या. त्या दरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त होता. मिरजकर तिकटी येथे दुपारी तीनपासूनच पोलिस हजर होते. महाद्वार रोडवर मिरवणुका आल्यानंतर तणाव निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तो निवळला. त्यानंतरही कार्यकर्त्यांची धुसफूस सुरू असल्याचे चित्र होते.

एकोपा
शिवजयंती व रमजान ईदच्या निमित्ताने उत्तरेश्‍वर पेठेतील हिंदू-मुस्लिम बांधवातील एकोपा आज दिसून आला. दोन्ही समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. हिंदू धर्मियांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com