फुटबॉलपटूं घडविण्याचा मोबदला
आता स्थानिक क्लबना मिळणार

फुटबॉलपटूं घडविण्याचा मोबदला आता स्थानिक क्लबना मिळणार

फुटबॉलपटू घडविण्याचा मोबदला
आता स्थानिक क्लबना मिळणार
‘एआयएफएफ’चा निर्णय; प्रतिभावान फुटबॉलपटूंच्या प्रक्रियेला मिळणार गती
दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ : देशात फुटबॉल खेळाडू घडविण्यात लहान क्लबचा सिंहाचा वाटा असतो; पण, त्यांनी घडविलेला खेळाडू मोठ्या संघाशी करारबद्ध होतो तेव्हा मात्र मोबदला मिळण्यात तांत्रिक अडचणी होत्या. संबंधित क्लब किंवा ॲकॅडमी राष्ट्रीय यूथ लिगमध्ये सहभागी असल्यासच ही रक्कम मिळण्यास पात्र होती. आता ही अट रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) घेतला आहे. परिणामी, तळागाळातल्या क्लब वा अकदमींना बळ मिळणार आहे. त्यातून प्रतिभावान फुटबॉलपटू घडविण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.
भारतीय फुटबॉलमध्ये व्यावसायिक संघापेक्षा ग्रामीण भागातील हौशी संघ आणि क्लब नवोदित खेळाडूंना आकार देण्यात आघाडीवर आहेत. सोयीसुविधा, पुरस्कर्त्यांचा अभाव असतानाही चिकाटीने खेळाडूला पैलू पाडण्याची प्रक्रिया अशा संस्थांकडून वर्षानुवर्षे सुरू आहे. या क्लबच्या खेळाडूला मोठ्या संघाने घेतल्यास कोणताही मोबदला मिळायचा नाही. आर्थिक अडचणींमुळे बहुतांश संघ एआयएफएफच्या यूथ लिगमध्ये सहभागी होत नव्हते. परिणामी, प्रतिभावान खेळाडू घडविणारेच उपेक्षित राहायचे. अशा संघ आणि अकादमींना प्रोत्साहन देण्यासाठी एआयएफएफने ही अट रद्द करून नव्या पर्वाचा श्रीगणेशा केला आहे.
यापुढे क्लबला आपला खेळाडूची ऑनलाईन केंद्रीय नोंदणी पद्धतीत (सीआरएस) नोंद करावी लागेल. त्यामुळे कोणताही संघ त्या खेळाडूला घेत असताना संबंधित क्लब वा अकादमीला भरपाई रक्कम द्यावी लागेल. परदेशात अशीच पद्धत कार्यरत आहे. पुढील हंगामापासून या नियमाची अंमलबजावणी एआयएफएफ करणार आहे. या नियमामुळे मूळ संघाला खेळाडू घडविण्यासाठीचा योग्य तो मोबदला मिळेल. त्यातून अनेक नव्या खेळाडूंना सुविधा, प्रशिक्षण मिळून गुणवत्ता संवर्धनाला प्रोत्साहन मिळू शकेल, असे जाणकारांचे मत आहे.

नोंदणी वाटा राज्य संघटनांना
पुढील हंगामापासून खेळाडू नोंदणीसाठी अधिक अधिकार राज्य संघटनांना देण्याचा निर्णयही ‘एआयएफएफ’ने घेतला आहे. खासकरून आंतरराज्य बदली खेळाडूंचे निश्चितीकरणाचे सर्वाधिकार दिले जातील. तसेच खेळाडू नोंदणीच्या उत्पन्नातील ७५ टक्के वाटाही राज्य संघटनांना देण्याचे जाहीर केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com