कुरुंदवाड ः खिद्रापूर पर्यटन - सुविधांच्या प्रतिक्षेत - 3 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुरुंदवाड ः खिद्रापूर पर्यटन - सुविधांच्या प्रतिक्षेत - 3
कुरुंदवाड ः खिद्रापूर पर्यटन - सुविधांच्या प्रतिक्षेत - 3

कुरुंदवाड ः खिद्रापूर पर्यटन - सुविधांच्या प्रतिक्षेत - 3

sakal_logo
By

लोगो -खिद्रापूर पर्यटन सुविधांच्या प्रतिक्षेत

‘खिद्रापूर’च्या विकास आराखड्याची गरज
भविष्यात चित्र बदलण्याची आशा; मंदिराचे ‘ब्रॅण्डीग’ आवश्यक
अनिल केरीपाळे : सकाळ वृत्तसेवा
कुरुंदवाड, ता. २७ : कोपश्‍वर मंदिराच्या माध्यमातून धार्मिक पर्यटनाला खूप वाव असून यानिमित्ताने खिद्रापूर परिसराचा विकास झाल्यास पायाभूत सुविधा निर्माण होतील. पर्यटनवाढ होवून स्थानिक रोजगार निर्मितीतून आर्थिक समृध्दी होवू शकते. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने खिद्रापूरचा कालबद्ध विकास आराखडा तयार करुन तो प्रत्यक्षात उतरवला पाहिजे.
मंदिराच्या आवारातील प्रशस्त जागेत बगीचा व हिरवळ विकसित करता येवू शकते. त्यामुळे मंदिर परिसराचे सुशोभीकरण होईलच, शिवाय मंदिराच्या सौंदर्यात भर पडेल. मंदिराभोवताली नव्या इटालियन फरशा बसविल्यास पर्यटकांना उन्हाचा त्रास होणार नाही. मंदिरातील अंतर्गत विकासासाठी पुरातत्त्व विभागानेही लक्ष घालावे. मूळ वास्तूला हात न लावता जीर्णोद्धारच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. राज्य शासन कोपेश्‍वर मंदीर व परिसराच्या विकासासाठी १०० कोटींचा भरभक्कम निधी देण्यास तयार आहे. अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतूदही केली आहे. मात्र पुरातत्त्व विभागाची परवानगी हवी. मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडीटचा प्रस्ताव असून राज्य शासनाने लेखापरिक्षक नेमला आहे. त्यांच्या अहवालानंतरच विकासाची दिशा स्पष्ट होईल.
दरम्यान, काही महिन्यापूर्वी पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली कोपेश्‍वर मंदिराची दुरुस्ती, तर रस्ते विकास महामंडळातर्फे परिसराच्या विकासासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या अनुषंगाने महामंडळाचे संचालक पुलकुंडवार ‍यांनी पथकासमवेत प्रत्येक्ष पाहणी केली. ते म्हणाले, ‘‘मंदिराच्या दुरुस्तीचे अधिकार पुरातत्त्व विभागाला आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसार मंदिर दुरुस्तीचा तर परिसराचा विकास, जतन आणि संवर्धन महामंडळातर्फे करण्यात येईल.’’
----
कोट..
कोपेश्‍वर मंदिराची शिल्पकला अद्भूत अशीच आहे. अनेक राज्यातून येणाऱ्या पर्यटकांसाठी बहुभाषिक गाईड नाही. मुलभूत सुविधा नाहीत. हे चित्र बदलायला हवं. मंदीर संवर्धन व जतन करण्यासाठी पुरातत्व, पर्यटन, सांस्कृतिक, परिवहन यांनी संयुक्त कार्यक्रम राबवून विकास आराखडा बनवावा. मंदिराचे ब्रॅण्डीग केल्यास पर्यटक वाढतील.
- महेश जानवेकर, शिक्षक, विद्या मंदिर खिद्रापूर
----
खिद्रापूरमधील श्री कोपेश्‍वर मंदीराची शिल्पकला खजुराहोप्रमाणे आहे. शेकडो पर्यटक दररोज येतात. सोईसुविधासह मंदिरासमोरील प्रशस्त जागेत बगीचा, घाट उभा करण्याची गरज आहे. कृष्णा नदीत बोटींग सुविधा करावी, फूडकोर्ट उभारावे, नवा लूक द्यावा. सोईसुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटक अधिकवेळ थांबतील. निवांतपणा मिळेल व निवास भोजन चांगला नास्ता मिळाल्यास त्याचा फायदा ग्रामस्थांनाच होईल.
- असिफ कागवाडे, गाईड
---
श्री कोपेश्‍वर मंदिरामुळे खिद्रापूर गावाचे नाव जागतिक पर्यटनात आहे. पर्यटक येतात. मात्र ग्रामपंचायतीचे उत्पन कमी असल्याने सोईसुविधा पुरविण्यावर मर्यादा आहेत. शासनाने पर्यटन स्थळ म्हणून विशेष निधी द्यावा.
- सारिका कदम, सरपंच
----
श्री कोपेश्‍वर मंदिर हे महाराष्ट्राचे वैभव आहे. नजीकच्या काळात १०० कोटींच्या विकास निधीचा मार्ग मोकळा होईल. त्यातून कोपेश्‍वर मंदीरासह परिसराचा कायापालट करेन. तोपर्यंत पावणेचार कोटींचा निधी मंजूर असून त्यातून आधुनिक स्वच्छतागृह, पार्किंग, स्वागतकमान व नदीवर घाट ही कामे सुरु होतील.
- राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार