
Kolhapur : पालेभाज्या कडाडल्या; टोमॅटो उतरले, समुद्री माश्यांची आवक अंतिम टप्यात
गडहिंग्लज - येथील भाजी मंडईत उन्हाळ्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून मागणीपेक्षा आवक कमी असल्याने पालेभाज्या कडाडल्या आहेत. तुलनेत टोमॅटोची आवक अधिक असल्याने दर उतरले आहेत. मटण मार्केटमध्ये समुद्री माश्यांची आवक अंतिम ठप्प्यात असल्याने दर वधारले आहेत. सरासरी २५ ते ४० टक्के दर वाढले आहेत.
गवार, बिन्स, आल्याची दरातील तेजी टिकून आहे. फळबाजारात कलिंगडाची आवक कमी झाली आहे. ओल्या भुईमूागाच्या शेंगाची आवक वाढली आहे. वाढत्या उष्म्यामुळे कोंथबिर, पालेभाज्यांची आवक कमी आहे. केवळ पन्नास टक्के आवक सीमाभागातून सुरू आहे. यामुळे पालेभाज्यांचे दर दुपटीने वाढले आहेत. आकारानुसार पेंढीचा १५ ते २० रुपये असा दर आहे. शेवगा, कांदापातचा दरही अधिक आहे.
हिरवी मिरची, ढब्बू, दिडगा, गवार यांचे दरातील तेजी कायम आहे. सरासरी ६० ते ८० रुपये किलो दर आहे. कांद्याचा दर स्थिर असून क्विंटलचा ६०० ते ११०० तर किळकोळ बाजारात किलोचा १५ ते २५ रुपये किलो दर आहे. बटाटा १४००- १८०० क्विंटल तर किलोचा २० ते २५ किलोचा भाव आहे. लिंबू, आल्याचे दर वाढलेले दर कायम आहेत. दहा किलोचे दर असे भेंडी, वांगी, दोडका २००, टोमँटो १५०, कोबी ३००, बिन्स, गवार ६००, काकडी ४००, कोंथिबिर १३०० शेकडा पेंढी.
महिन्याभरापासून मच्छी बाजारात कोकणातून येणाऱ्या समुद्री माश्यांची आवक कमी झाली आहे. मच्छीमारीला एक जूनपासून पायंबद घातल्याने सध्याची आवक बंद होणार असल्याचे विक्रेते आसिफ बोजगर यांनी सांगितले. त्यामुळे सुरमई, पापलेट यांचे दर वाढले आहेत. किलोमागे २०० ते ४०० रुपयांनी दर वधारले आहेत. नदी, तलावातील माश्यांची आवक स्थिर आहे.
किलोचे दर असे : सुरमई १२००, पापलेट १६००, रावस ५००, प्रॅाझ ६००, बोंबील ३००, कटला, मांदेली, खेकडा २००, रहू १६०, बांगडा १६० रुपये. फळबाजारात आंबे सोडून सर्वच फळांची आवक मंदावली आहे. सफरचंद १४०- २००, डाळींब, चिक्कू, मोसंबी ८०- १०० रुपये किलो आहेत.
कलिंगडाची आवक अंतिम ठप्प्यात असल्याने दर वाढले आहेत. बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात उन्हाळ्यामुळे आवक मंदावली आहे. सुमारे सत्तर टक्के आवक कमी झाल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. पाऊस सुरु झाल्यानंतर ही आवक पुर्वतत होणार असल्याचे विक्रेत्यांनी माहिती दिली.
फळांचा राजा बहरला
गेल्या आठ दिवसापासून फळ बाजारात स्थानिक आंब्याची आवक वाढली आहे. मार्च महिन्यापासून फळांचा राजाची आवक सुरु झाली होती. पण, कोकणातून आवक न वाढल्याने हाफूस आंब्याचे दर मे मध्यापर्यंत चढेच राहिले.
परिणामी, सर्वसामान्यांसाठी आंबा आंबटच राहिला. कर्नाटकी आंब्यामुळे ग्राहकांची फसवणूक झाली. स्थानिक आवक वाढल्याने दर थोडे उतरले आहेत. डझनाचा ३०० ते ५०० रुपयापर्यंत दर आहे. आठवडा बाजारात शंभरहुन अधिक विक्रेते आंब्याची विक्री करीत होते.