
शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत आरोग्य विभागाचे ५ हजार लाभार्थी
आरोग्य विभागाच्या ५२९१ जणांना लाभ
कोल्हापूर, ता. २९ ः महापालिकेच्यातीने शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत ५ हजार २९१ लाभार्थ्याना आजअखेर लाभ दिला आहे. यामध्ये ४ लाख २० हजार ५०० रूपये इतके अनुदान लाभार्थ्यांना दिले आहे. महापालिकेच्या ११ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व २ नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र आहेत. या सर्व केंद्रामध्ये आयुषमान भारत हेल्थ अकाऊंट कार्ड, गोल्डन कार्ड, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रम, पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया, स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया या योजनेतंर्गत नागरिकांना लाभ दिला आहे.
आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट कार्डद्वारे ३९३० लाभार्थ्याना लाभ दिला आहे. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील व अनुसूचीत जाती जमातीमधील ग्रामीण भागातील गरोदर मातांना घरी प्रसुती झाल्यास ५०० रूपये, शहरी भागातील लाभार्थी महिलेस प्रसुती झाल्यानंतर ६०० रूपयांचा लाभ देण्यात येतो. या योजनेमध्ये मान्यता प्राप्त रूग्णालयात शस्त्रक्रियेव्दारे प्रसुती झाल्यास १ हजार ५०० रूपयांचे अनुदान देण्यात येते. यामध्ये शहरातील १७० लाभार्थ्याना लाभ दिला. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही योजना महापालिका विभागातील गरोदर मातांसाठी राबविण्यात येत आहे. त्यामध्ये कुटुंबातील पहिल्या जिवंत अपत्यापर्यत त्या महिलेला ५ हजारचे आर्थिक सहाय्य ३ हप्त्यात दिले जाते. प्रधानमंत्री आयुष्मान योजनेतंर्गत ९४२ लाभार्थ्याना या कार्डचे वाटप केले आहे. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत सावित्रीबाई फुले रूग्णालय येथे १३ लाभार्थ्यानी २ लाख ६० हजार इतक्या रकमेच्या मोफत उपचाराचा लाभ दिला आहे.