‘निवारा’ हरवल्याने प्रवासी उन्हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘निवारा’ हरवल्याने प्रवासी उन्हात
‘निवारा’ हरवल्याने प्रवासी उन्हात

‘निवारा’ हरवल्याने प्रवासी उन्हात

sakal_logo
By

gad302.jpg
05815
दुंडगे : संकेश्वर-बांदा महामार्गासाठी बसथांब्याजवळील भले मोठे झाड कापल्यामुळे प्रवाशांना उन्हामध्ये थांबावे लागत आहे. (छायाचित्र : संजय धनगर, जरळी)
------------------------------
‘निवारा’ हरवल्याने प्रवासी उन्हात
महामार्गाच्या कामाने शेड जमिनदोस्त; पावसाळ्यात होणार मोठी अडचण
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३० : संकेश्वर-बांदा महामार्गाचे काम सुरु आहे. त्यासाठी केलेल्या रूंदीकरणात प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेली निवारा शेड जमिनदोस्त झाली आहेत. त्यासोबत रस्त्याकडेची झाडेही तोडली आहेत. परिणामी, प्रवाशांना भर उन्हात बसची प्रतीक्षा करीत थांबावे लागत आहे. पण, मोठी अडचण होणार आहे ती पावसाळ्यात. कारण, महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतरच निवारा शेडची उभारणी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना यंदाचा पावसाळा निवारा शेड शिवाय काढावा लागणार हे निश्चित.
गडहिंग्लज-बांदा महामार्गाचे काम पाच-सहा महिन्यापासून सुरु आहे. पहिल्या टप्प्यात संकेश्वर ते आजरा या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. या रस्त्याकडेची झाडांची तोड केली. पण, रस्त्याकडेच्या गावांचा परिसर वगळला होता. मात्र, काम जसे पुढे जाईल त्यानुसार गावाजवळच्या झाडांचीही तोड केली. त्यासोबत मूळ रस्त्याच्या दुतर्फा रूंदीकरण केले आहे. रुंदीकरणात प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक गावच्या बसथांब्याजवळ उभारलेली निवारा शेडही जमिनदोस्त झाली आहेत. त्यामुळे प्रवाशांचा निवाराच हरवल्याची परिस्थिती आहे.
दुचाकी, खासगी चारचाकी वाहनांची संख्या वाढली असली तरी एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बसची प्रतीक्षा करीत प्रवाशी या शेडमध्ये थांबत होते. उन्हाळ्यात उन्हापासून तर पावसाळ्यात पावसापासून बचाव होत होता. पण, निवारा शेड महामार्गाच्या कामासाठी काढली आहेत. शिवाय झाडांचीही तोड झाली असल्याने प्रवाशांना सध्या उन्हातच बसची प्रतीक्षा करीत थांबावे लागत आहे.
दरम्यान, महामार्गाचे सध्या हिरलगेपासून निलजीपर्यंत एका बाजूचे काम पूर्ण झाले आहे. गावच्या ठिकाणी गटर्स बांधणीचे काम सुरु आहे. पावसाळ्यापूर्वी दोन्ही बाजू पूर्ण होणे शक्य नाही. दुसरीकडे महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय निवारा शेड उभा केली जाणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांची पावसाळ्यात मोठी अडचण होणार आहे. आता उन्हापासून कसेतरी संरक्षण करणाऱ्या प्रवाशांना पावसापासून संरक्षणाची तयारी ठेवावी लागणार आहे.
------------------
ज्येष्ठांना अधिक त्रास
एसटीच्या प्रवास शुल्कात ज्येष्ठ नागरीकांना सवलत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरीकांकडून एसटी प्रवासाला प्राधान्य दिले जाते. बसथांब्यावर एसटीची प्रतीक्षा करताना त्यांना निवारा शेडचा मोठा आधार होता. पण, महामार्गाच्या कामात निवारा शेडच जमानदोस्त झाल्यामुळे ज्येष्ठ नागरीकांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. प्रचंड उन्हामुळे त्रासात अधिकच भर पडत आहे.