अतिक्रमणावरून वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमणावरून वाद
अतिक्रमणावरून वाद

अतिक्रमणावरून वाद

sakal_logo
By

05910

लक्ष्मीपुरीतील दोन शेड पाडली
व्यावसायिकांच्या विरोधानंतर कारवाई थांबली

कोल्हापूर, ता. ३० ः लक्ष्मीपुरीतील रिलायन्स मॉलजवळून शाहूपुरी कुंभार गल्लीत जाणाऱ्या रस्त्यावरील दोन शेड महापालिकेने जेसीबीच्या सहाय्याने पाडली. विस्थापित म्हणून जागा दिलेली असताना कोणतीही नोटीस न देता केलेल्या कारवाईमुळे व्यावसायिकांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे कागदपत्रे तपासून पुढील कारवाई करण्याचे ठरवण्यात आले. दरम्यान या विस्थापितांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात पोलिस ठाणे तसेच आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
इस्टेट विभाग, नगररचना विभाग, विभागीय कार्यालय व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्यावतीने दुपारपासून जेसीबी व कर्मचारी थांबून होते. चारच्या सुमारास जयंती नाल्याकडून अचानक कारवाईला सुरूवात केली. तेथील पत्र्याची असलेली दोन शेड पाडली. तिथून पुढील शेड पाडण्यासाठी कर्मचारी व अधिकारी आले असताना लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव व अन्य व्यावसायिकांनी विरोध केला. काहीही नोटीस न देता तसेच विस्थापित म्हणून जागा ठराव करून दिलेली असताना कारवाई कशी केली जाते असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावेळी इस्टेटच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला पर्यायी जागा दिली असल्याने ही अतिक्रमणे म्हणून पाडली जात असल्याचे सांगितले. त्यावर जाधव यांनी आम्हाला दिलेल्या जागा योग्य नाहीत म्हणून स्वीकारलेल्या नाहीत. त्यामुळे या जागेवर व्यवसाय केले जात आहेत. तसेच भाडे भरून घेण्यास सांगितले असतानाही महापालिकेने भरून घेतलेले नाही असे सांगितले. महापालिकेने जागा दिली पण आम्ही स्वीकारलेली नाही. त्यामुळे पुरावा द्या असे सांगितले. तो नसल्यास पोलिसांत तक्रार दिली जाईल असा इशाराही दिला. त्यानंतर इस्टेट विभागाने कागदपत्रे तपासून माहिती दिली जाईल असे सांगितले व कारवाई थांबवली. त्यानंतरही केलेले नुकसान कोण भरून देणार असा तगादा त्यांनी अधिकाऱ्यांकडे लावला. कारवाईवेळी उपशहर अभियंता नारायण भोसले, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, सतिश फप्पे उपस्थित होते.
दरम्यान, दलाल मार्केट विस्थापितांनी लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशनमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा अर्ज केला आहे. तसेच आयुक्तांकडेही या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे निवेदन दिले आहे.