
अनुदान धनादेश वाटप
घरकुल अनुदान धनादेशाचे वाटप
कोल्हापूर , ता. २ ः दुसऱ्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत स्वत:चे घर बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे. शिवसेना अंगीकृत महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या पाठपुराव्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना घरकुलासाठी मंजूर झालेल्या अनुदान रक्कमेच्या धनादेशाचे वाटप राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नैसर्गिक मृत्यू झालेल्या बांधकाम कामगारांच्या वारसांना मंजूर मदतीचे वाटपही यावेळी करण्यात आले. यावेळी शिवसेना - भाजप युतीचे शासन बांधकाम कामगारांच्या पाठीशी ठाम उभे असून, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही श्री. क्षीरसागर यांनी दिली. अटल बांधकाम कामगार घरकुल योजनेतून घरकुलासाठी पात्र ठरलेल्या गोरखनाथ शंकर नलवडे, दिपाली सुनील धुमाळ, आनंदा नामदेव चव्हाण, मानसिंग राजाराम पाटील, विजय रामचंद्र यादव यांना प्रत्येकी दीड लाख यासह नैसर्गिक मृत्यू झालेल्या बांधकाम कामगारांचे वारस मंगल सुरेश हल्ले, शोभा विश्वास कांबळे, भगवान रामचंद्र पलसे यांना प्रत्येकी २ लाख रूपये अशा धनादेशाचे वाटप झाले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, तालुका प्रमुख बिंदू मोरे, शिवसेना अंगीकृत बांधकाम कामगार संघटनेचे सुहास साका, सचिन पाटील, मेघा चव्हाण आदी उपस्थित होते.