
जागतिक दुग्धदिनी विविध उपक्रम
06361
कोल्हापूर : जागतिक दूध दिनानिमित्त ‘गोकुळ’तर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांना सुगंधी दुधाचे वाटप करताना अरुण डोंगळे. या वेळी अजित नरके, चेतन नरके, संभाजी पाटील, योगेश गोडबोले, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील आदी उपस्थित होते.
जागतिक दुग्धदिनी विविध उपक्रम
‘गोकुळ’चा पुढाकार; वृत्तपत्र विक्रेते, ज्येष्ठांना सुगंधी दूध वाटप
कोल्हापूर, ता. १ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे (गोकुळ) जागतिक दुग्ध दिन विविध उपक्रमांनी साजरा झाला. यानिमित्त शहरातील ६५० वृत्तपत्र विक्रेते, नाना-नानी पार्क येथे ज्येष्ठ नागरिक, तसेच संघातील कर्मचाऱ्यांना संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालकांच्या उपस्थितीत सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले.
नाना-नानी पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष डोंगळे म्हणाले, ‘‘वृत्तपत्र विक्रेत्यांचे आपल्या रोजच्या आयुष्यातही एक महत्त्वाचे स्थान आहे. रोजच्या ताज्या बातम्या देणारी वृत्तपत्रे पहाटेच आपल्या घरापर्यंत पोहचवण्याचे काम ही मंडळी अविरतपणे करत असतात, तेही पाऊस, थंडी, वारा याची तमा न बाळगता. या विक्रेत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. याबद्दल जागतिक दुग्ध दिनानिमित्त त्यांना ‘गोकुळ’तर्फे सुगंधी दूध वाटप करण्यात आले.
‘गोकुळ’ने ६० वर्ष पूर्ण करून ६१ व्या वर्षात पदार्पण केल्याने दुग्ध व्यवसायातील ज्येष्ठत्वाचा मान ‘गोकुळ’ला जातो. त्यामुळे या वर्षीचा जागतिक दुग्ध दिन ज्येष्ठ नागरिकांच्या समवेत साजरा केल्यामुळे आमचाही आनंद द्विगुणित झाला आहे. ज्येष्ठांनी तंदुरुस्त आरोग्यासाठी दुधाचे महत्त्व हे पुढील पिढीपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे.’’
या वेळी संचालक अजित नरके, चेतन नरके, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाला संचालक संभाजी पाटील, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, उपेंद्र चव्हाण, लक्ष्मण धनवडे, वृतपत्र विक्रते जिल्हाध्यक्ष किरण व्हनगुत्ते, रणजित आयरेकर, रघुनाथ कांबळे, नाना-नानी पार्कमधील ज्येष्ठ नागरिक भीमराव दरेकर, दिलीप शहा, पूनम शहा आदी उपस्थित होते.