उमळवाडचा युवक ठार

उमळवाडचा युवक ठार

32429
आदित्य कोळी

वादळी वाऱ्याने भिंत अंगावर
कोसळून उमळवाडचा युवक ठार

महिलेसह चौघे गंभीर जखमी; इनामधामणी येथील घटना

सकाळ वृत्तसेवा
सांगली, ता. १ ः सांगली शहरासह परिसरात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावत हाहाकार माजवून दिला. त्याची सुन्न करणारी बातमी मिरज तालुक्यातील इनामधामणी येथील ऐश्‍वर्या मॅरेज हॉल येथे घडली. अंगावर भिंत कोसळल्याने केटरिंग कामासाठी गेलेला महाविद्यालयीन युवक ठार झाला, तर एका महिलेसह चौघेजण जखमी झाले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही मन सुन्न करणारी घटना घडली.
आदित्य कपूर कोळी (वय १७, रा. उमळवाड, जि. कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे; तर कल्पना पंत (३५), सूरज सिंग (२४), लक्ष्मण श्रीकांत वरगंटे (२३), साहिल नंदीवाले (२५, सर्व रा. जयसिंगपूर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत करण्याचे काम सुरू होते. घटनेची माहिती मिळताच मृत आदित्यचे नातेवाईक आणि मित्रांनी शासकीय रुग्णालयात धाव घेत आक्रोश व्यक्त केला.
अधिक माहिती अशी, की इनामधामणी येथे ऐश्‍वर्या मॅरेज हॉल आहे. त्या ठिकाणी आज एक समारंभ होता. त्यावेळी केंटरिंगसह अन्य कामासाठी जयसिंगपूर, उमळवाड परिसरातील युवक आणि महिला आल्या होत्या. सकाळचा समारंभ झाल्यानंतर जेवणाची भांडी ठेवण्याचे काम सुरू होते. त्यावेळी साडेचार-पाचच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाने हजेरी लावली. मनात धडकी भरवणारा असाच पाऊस होता. पावसात भिजू नये म्हणून आदित्यसह सारेजण हॉलजवळील एका खोलीजवळ थांबले. सव्वापाच-साडेपाचच्या सुमारास जोरदार वारा आणि पावसामुळे तेथील एक बाजूची भिंतच कोसळली. अचानक झालेल्या घटनेमुळे साऱ्यांची धावपळ उडाली. आदित्य हा त्यात सापडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अन्य जणांना डोक्याला, पायाला, छातीला, पाठीला गंभीर स्वरूपाचा मार लागला.
या घटनेनंतर तातडीने जखमींना येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले; आदित्य यालाही आणण्यात आले. आदित्य याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले; तर जखमींवर तातडीने अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. घटनेची माहिती जयसिंगपूरसह उमळवाड परिसरात समजल्यानंतर नातेवाईक, मित्रमंडळींनी एकच गर्दी केली होती.
...
आदित्यला ‘आयपीएस’ व्हायचे होते
आदित्य कोळी याच्या घराची परिस्थिती हलाखीची आहे. त्याचे वडील सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. आदित्य हा हुशार विद्यार्थी होता. तो विज्ञान शाखेचे शिक्षण घेत होता. आदित्य हा शिक्षण पूर्ण करत कुटुंबाला हातभार म्हणून काम करत होता. त्याने ‘आयपीएस’ व्हायचं स्वप्न कुटुंबीयांसमोर व्यक्त केले होते. त्याच्या या जिद्दीचे गावातील लोकांना कौतुक होते. त्याच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर वडिलांसह घरातील नातेवाइकांनी एकच आक्रोश केला.
...
मित्रांचे अश्रू थांबता थांबेनात
आदित्य याचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्यामुळे उमळवाड परिसरात त्याचा मोठा मित्र परिवार होता. आजही तो कामाला आल्यानंतर त्याचे मित्र होते. त्यातील काही मित्रही जखमी झाले; तर अन्य मित्रांना माहिती समजल्यानंतर तातडीने रुग्णालयात धाव घेतली. बातमी ऐकताच मित्रांचे अश्रू थांबता थांबेना. आदित्य याच्या लहान भावाचा आक्रोशही काळीज पिळवटून टाकणारा होता. यामुळे रुग्णालय परिसर सुन्न झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com