पौष्टीक पीक संग्रहालये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पौष्टीक पीक संग्रहालये
पौष्टीक पीक संग्रहालये

पौष्टीक पीक संग्रहालये

sakal_logo
By

फाईल फोटो
...

खेड्यांमध्ये आता पौष्टीक तृणधान्य पीक संग्रहालय

आंतरराष्ट्रीय अभियान : राज्याभरात एक लाख, तर जिल्ह्यात २७७८ संग्रहालये

अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज, ता. २ : आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य अभियानाच्या माध्यमातून यंदाच्या खरीप हंगामाला केंद्र व राज्य शासनाने व्यापक स्वरुप दिले आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात प्रत्येक गावामध्ये पाच-पाच गुंठ्यांच्या दोन प्रात्यक्षिकातून पौष्टीक तृणधान्याच्या उत्पादनाद्वारे राज्यभर एक लाख पीक संग्रहालयाची निर्मिती होणार आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात २७७८ प्रात्यक्षिकांचा समावेश आहे. नाचणी, बाजरी, वरई, कोडो, राळा, राजगिरा, ज्वारी या तृणधान्याचे आरोग्यातील महत्व शेतकऱ्यां‍ना पटवून देण्यासाठी कृषी विभागातर्फे पहिल्यांदाच हा प्रयोग हाती घेतला आहे.
आहारामध्ये पौष्टीक तृणधान्याचे महत्व मोठे आहे. यामुळे केंद्र सरकारने आंतराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे करण्याचे ठरविले आहे. त्या अनुषंगाने तृणधान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी वेगवेगळ्या उपायांची अंमलबजावणी सुरु आहे. शेतकऱ्यां‍सह प्रत्येक गावातील नागरिकांना तृणधान्याचे उत्पादन कसे येते, त्याचे महत्व आणि आहारातील गरज पटवून देण्यासाठी यंदाच्या खरीपात त्याच्या लागवडीवर भर देण्यात आला आहे. त्यासाठी कृती आराखडाच कृषी विभागाने तयार केला आहे. राज्यातील सर्व खेड्यामध्ये दोन प्रात्यक्षिक प्लॉटची (प्रत्येकी ५ गुंठे क्षेत्र) निवड करण्यात येणार आहे. या प्रात्यक्षिक प्लॉटला ‘तृणधान्य पीक संग्रहालय’ असे नावही दिले आहे. त्यात ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कोडो, राजगिरा या सहा प्रकारच्या तृणधान्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
या संग्रहालयासाठी लागणारी बियाणे शेतकऱ्यां‍ना मोफत देण्यात येणार आहेत. प्रत्येक प्लॉटला ३७५ ग्रॅम बियाणांचे पाकीट देण्यात येणार असून राज्यातील ४० हजारहून अधिक गावांसाठी एक लाख बियाणे पॅकेटची आवश्यकता आहे. त्याची जबाबदारी राज्य बियाणे महामंडळावर सोपविली आहे. या पीक संग्रहालयासाठी इच्छूक शेतकऱ्यां‍नी स्वत:हून पुढे येण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. दरम्यान, पूर्वी राळा, बाजरी, वरई, राजगिरा, कोडो याचे उत्पादन होत होते. परंतु हरितक्रांतीमध्ये भात, ज्वारी व गहू या तीन पिकांचे उत्पादन इतके वाढले की, ही आरोग्यदायी पौष्टीक तृणधान्ये गायब झाली. म्हणूनच मानवी आहारात अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या‍ याच तृणधान्याच्या प्रसाराची मोहिम शासनाला राबवावी लागत आहे.
...


* ५ गुंठ्यात सहा पिके

ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा प्रत्येकी एक गुंठ्यात तर कोडो व राजगिऱ्या‍चे उत्पादन प्रत्येकी अर्ध्या गुंठ्यात घेण्यात येणार आहे. त्यासाठी १० वर्षाच्या आतील व वरील सत्यप्रत बियाणांचा पुरवठा होणार आहे.
...

* शेत तिथे पौष्टिक तृणधान्य

यावर्षीच्या खरीपात शेत तिथे तृणधान्य मोहिमेतंर्गत नाचणी, तूर, मुग, भुईमूग, सोयाबीन बियाणांचे मिनी किटही शेतकऱ्यां‍साठी कृषी विभागाने उपलब्ध केले आहे. तूर, मूग, नाचणीचे बियाणे मोफत मिळणार आहेत.