
नांगरट साहित्य संमेलन
साहित्यिकांच्या लेखणीचा नांगर व्हावा
रामदास फुटाणे ः पहिले नांगरट साहित्य संमेलन
कोल्हापूर, ता. ४ ः ‘कान्होपात्राला क्लिओपात्रा बनवणाऱ्या आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेतील शेतकऱ्याला किती वाट मिळतो, २० टक्के इंडिया वेगाने पुढे जातो, ८० टक्के भारत तिथेच राहतो. त्यात बहुतांशी शेतकरी आहेत. त्यांची शेती पूर्वी तोट्यात होती. आजही तोट्यातच आहे. त्या शेतीचे प्रश्न, समस्या, अर्थकारण साहित्यात येण्यासाठी साहित्यिकांच्या लेखणीचा नांगर झाला पाहिजे,’ असे मत वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पहिल्या नांगरट साहित्य संमेलनाचे उद्घाटन फुटाणे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कवी विठ्ठल वाघ संमेलनाध्यक्ष आहेत.
फुटाणे म्हणाले, ‘‘सातव्या वेतन आयोगाची पेन्शन घेणाऱ्यांना महिन्याला ८० हजार पेन्शन मिळते. तर शेतकऱ्याला वर्षातून एकदा साठ हजार अनुदान मिळते. शेतकऱ्याचे कल्याण झाल्याची चर्चा होते. हे गणित सांगण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे. दीड लाख कोटींची बॅंकांतून उलाढाल होते, त्यातील काही नगण्य लाख रुपये शेतकऱ्यांच्या वाट्याला येतात. शेतकऱ्याला पॅकेज मिळाल्याच्या चर्चा होतात. शेतकऱ्याला कोणी, किती फसवते हे साहित्यिकांनी साहित्यातून सांगितले पाहिजे.’
कवी विठ्ठल वाघ म्हणाले, ‘देशात घाम गाळणाऱ्या, रक्ताचे पाणी करून शेती पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनेक पिढ्यांनी शेती केली. पण शेती तोट्यात आहे. जगण्याचे प्रश्न कायम आहेत. कोयना धरणाचा पाणीसाठा १०५ टीएमसी आहे. चीन देशात एका नदीवर दीड हजार टीएमसी क्षमतेचे धरण आहे. त्या देशात शेतीला पाणीच पाणी आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होत नाही. आपल्या देशात शेतीला पाणीच नाही, तर आपला शेतकरी जगेल कसा? असा प्रश्न आहे. शेती पिकवण्यापासून ते विकण्यापर्यंतचे प्रश्न आहेत. ते साहित्य व कवितेतून आले पाहिजेत. नव्या दमाचे साहित्यिक शेतकऱ्यांतून निर्माण व्हावेत, त्यासाठी ही साहित्य संमेलने ऊर्जा देत आहेत.’’
माजी आमदार वामनराव चटप म्हणाले, ‘‘शेतकरी नेते शरद जोशी यांच्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांची चळवळ उभी राहीली. त्या चळवळीच्या वाटा आज वेगवेगळ्या असल्या तरी शेतकऱ्यांची कल्याण हीच दिशा घेऊन शेतकरी चळवळी पुढे निघाल्या आहे. अशा स्थितीत साहित्यातून शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडणे अपेक्षित आहे.’’
ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे व माजी आमदार वामनराव चटप यांना या वेळी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, मानपत्र, शेतीमालाचे आरोग्यदायी प्रतीक असलेला भोपळ्याची प्रतिकृती देण्यात आली.
...
संपत्तीचा वाटा कुठे गेला?
‘देशातील संपत्तीचा वाटा कोण किती वापरतो हेही तपासले पाहीजे. कारण किंगफिशरवाल्यासह ललित मोदीसारखे लोक हजारो कोटी बुडवून विदेशात गेली. तरीही अर्थमंत्री त्यांना अभय देतात. त्या तुलनेत शेतकऱ्याला काहीही मिळत नाही,’ असे फुटाणे यांनी सांगितले.