
आजरा ः आजरा कारखान्याची निवडणुक लांबणीवर
आजरा कारखान्याची
निवडणूक लांबणीवर
३० सप्टेंबरनंतर निवडणूक ः पावसासह अन्य कारणे
आजरा, ता. ९ ः आजरा साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे तेथून लांबणीवर टाकण्यात आली आहे. कारखान्याची निवडणूक आता ३० सप्टेंबरनंतर होणार आहे. मान्सून पाऊस, त्यामुळे उद्भभवणारी आपत्तीजन्य परिस्थिती, खरीपाची कामे या गोष्टींचा विचार करून निवडणूक लांबणीवर टाकण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश राज्यपालांच्या सहीने लागू करण्यात आला आहे.
कार्यासन अधिकाऱ्यांनी आदेशाची प्रत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे, साखर आयुक्त, सचिव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक यांना पाठवली आहे.
कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत २३ मे २०२३ ला संपुष्टात आली. त्यानुसार जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर यांनी निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरवात केली. आजरा साखर कारखान्याची प्रारुप मतदार यादी २ मेला तर अंतिम मतदार यादी २५ मेला प्रसिध्द केली होती. कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम ४५ दिवसांचा असल्याने निवडणूक १२ जुलै ते १९ जुलै २०२३ दरम्यान होण्याची शक्यता होती. या कारखान्याचे कार्यक्षेत्र हे आजरा व चंदगड या अतिपावसाच्या प्रदेशात आहे. या भागात जूनपासून पावसाला सुरवात होते. या दरम्यान शेतकरी सभासद हे खरीप पिकांच्या लावणीत व्यस्त असतात. तसेच पावसाच्या परिस्थितीमध्ये पुनर्नियोजन व अन्य कारणांनी शासकीय अधिकारी व यंत्रणा व्यस्त असते. अशा परिस्थितीत कारखान्याची निवडणूक प्रक्रिया राबविणे सभासद, मतदार व निवडणूक यंत्रणेच्या सोयीची नसल्याने निवडणूक लांबणीवर टाकण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.