पोलिस वृत्त एकत्रित

पोलिस वृत्त एकत्रित

Published on

हप्ते थकल्याचे सांगून तोतया वसुली
अधिकाऱ्यांनी दुचाकी पळविली
कोल्हापूर ः आम्ही बॅंकेचे वसुली अधिकारी आहोत, तुमच्या दुचाकीचे हप्ते थकले आहेत, त्यामुळे ताब्यात घेण्यासाठी आलो आहोत, असे सांगून तोतया चार वसुली अधिकाऱ्यांनी दुचाकी पळविली. याची फिर्याद चाफोडी (ता. करवीर) येथील अतुल दिलीप कांबळे (वय २६) यांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल कांबळे यांनी घेतलेल्या दुचाकीचे शेवटचे चार हप्ते थकले होते. एकाच वेळी सर्व हप्ते भरून कर्ज फेड करण्याची त्यांची तयारी होती. मात्र, चार हप्ते थकल्याचे सांगून तोतया वसुली अधिकारी दुचाकी घेऊन गेले. जूनच्या पहिल्या आठवड्यात हा प्रकार घडला. बँकेच्या वसुली पथकाने दुचाकी ताब्यात घेतल्याची माहिती अतुल यांनी बॅंकेत जाऊन अधिकाऱ्यांना दिली. तातडीने कर्ज फेडतो दुचाकी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तेथे अधिक माहिती घेतली असता वसुली पथकाने जप्त केलेल्या वाहनांमध्ये त्यांची दुचाकी नसल्याचे दिसले. यावेळी तोतया वसुली अधिकाऱ्यांनी फिर्यादी अतुल यांची दुचाकी पळविल्याची माहिती पुढे आली. फिर्यादीच्या माहितीनुसार पोलिसांनी अनोळ‌खी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पाणी दिले नाही म्हणून पत्नीला केली मारहाण
कोल्हापूर : दारू पिऊन आलेल्या पतीने पाणी मागितल्यावर दिले नाही म्हणून पत्नीला त्याने लाटण्याने बेदम मारहाण केली. कसबा बावडा येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली. याबाबत पत्नीने पतीच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.

कळंब्यात एकास मारहाण
कोल्हापूर ः कळंबा (ता. करवीर) येथील मुख्य मार्गावर वीरेश्वर बँकेच्या एटीएम सेंटरसमोर मंगळवारी (ता. ४) दुपारी थांबलेल्या एकास अनोळखीस तिघांनी मारहाण केली. यामध्ये चंद्रदीप तानाजी पाटील (वय २७, रा. कांचनवाडी, ता. करवीर) हा जखमी झाला. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात तिघांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती करवीर पोलिसांनी दिली.

सराफ दुकानात घुसून दोघांनी केली मारहाण
कोल्हापूर ः दैवज्ञ बोर्डिंग येथील गाळा नंबर पाचच्या मसूरकर ब्रदर्स सराफ दुकानात घुसून दोघांनी प्रणव प्रकाश मसूरकर (वय २३, रा. एलआयसी कॉलनी, कळंबा रोड, कोल्हापूर) याला मारहाण केली. बुधवारी (ता. ५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. जखमी मसूरकर याने दिलेल्या फिर्यादीनुसार ऋतुराज भिलवडे (रा. मोरेवाडी, ता. करवीर) याच्यासह त्याच्या सोबत आलेल्या एकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली.
....................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.