नविन आयुक्तांसमोर आव्हानांचा डोंगर

नविन आयुक्तांसमोर आव्हानांचा डोंगर

ich66,7.jpg
14450
इचलकरंजी ः १) आसरानगर डेपोतील कचऱ्याच्या हा डोंगर मार्गी लावण्याची आवश्यकता आहे.
14451
२) अतिक्रमणाच्या जटील प्रश्नातून शहर मुक्ततेची वाट पाहत आहे.

नविन आयुक्तांसमोर आव्हानांचा डोंगर
इचलकरंजी महापालिका; विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी करावी लागणार कसरत

पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ६ ः इचलकरंजी महापालिकेच्या स्थापनेला नुकतीच वर्षपूर्ती झाली. यामध्ये काही प्रश्नांना गती मिळाली आहे. पण अद्यापही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अतिक्रमणमुक्त शहर, साचलेल्या कच-यावरील प्रक्रिया, आर्थिक शिस्त, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव, दुधगंगा पाणी योजनेला गती असे अनेक प्रश्न शहराच्या विकासात अडथळा ठरत आहेत. नजिकच्या काळात हे मार्गी लावण्याचे मोठे आव्हान नूतन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यासमोर आहे.
त्यांना इचलकरंजी शहराची तोंडओळख आहे. त्यामुळे त्यांच्या कामकाजाबाबत शहरवासियांना मोठ्या अपेक्षा आहेत. मावळते आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पहिल्या टप्प्यात प्रशासकीय कामकाजाला शिस्त लावली. त्यासाठी नियुक्त केलेल्या भरारी पथकाचा दरारा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतला होता. ही प्रशासकीय शिस्त पुढील काळात राखण्याची जबाबदारी नूतन आयुक्त दिवटे यांच्यासमोर असणार आहे.

- दुधंगगा योजना मार्गी लावण्यासाठी कसरत
शहरातील सर्वात संवेदनशील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. शहरासाठी सुळकूड उद्‌भव असलेली दुधगंगा योजना मंजूर झाली आहे. पण दुधगंगा काठावरील गावांच्या विरोधामुळे ही योजना रखडली आहे. यातून मध्यम मार्ग काढीत ही योजना मार्गी लावण्यासाठी त्यांना कसरत करावी लागणार आहे.
-------
- कृष्णा योजनेच्या सक्षमीकरणाला गती
सध्या शहराची तहान भागवण्याचे काम प्राधान्याने कृष्णा योजना करीत आहे. या योजनेचे तीन टप्प्यात सक्षमीकरण करण्यात येत आहे. यातील एक टप्पा पूर्ण झाला आहे. दुसरा पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. त्याला अधिक गती द्यावी लागणार आहे. तिसऱ्या टप्प्याची निविदा निघाली आहे. त्याचे काम गतीने पूर्ण करावे लागणार आहे.
-------
- साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया कधी?
आसरानगर डेपोमध्ये अद्यापही साचलेल्या कचऱ्याचा डोंगर उभा आहे. यावर प्रक्रिया करण्यासाठीचा १७ कोटीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबीत आहे. तर केवळ पाच कोटीची निधी प्राप्त आहे. पण त्याबाबत पुढील प्रक्रिया रेंगाळली आहे. सतत कचरा डेपोत आग लागत असल्यामुळे परिसरातील नागरिक हैराण आहेत. कचऱ्याचा हा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी गतीने पाठपुरावा करावा लागणार आहे.
-----
- आर्थिक शिस्त हवी
सध्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. त्यामुळे पुढील काळात आर्थिक शिस्त लावणे महत्वाचे आहे. वर्षभरात मावळते आयुक्त देशमुख यांनी चांगले प्रयत्न केले होते. पुढील काळात अनावश्यक कामे टाळण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
----
- अतिक्रमणचा जटील प्रश्न
फेरीवाल्यांच्या अतिक्रमणचा जटील प्रश्न सध्या गंभीर बनत आहे. यासाठी फेरीवाला झोन करण्यास गती देण्याबरोबरच ‘होर्डिंग्जमुक्त इचलकरंजी’ प्रमाणे ‘अतिक्रमणमुक्त इचलकरंजी’ अभियान राबवण्याची नितांत गरज आहे. शहरातील बहुतांशी फुटपाथ फेरीवाल्यांच्या ताब्यात आहेत. हे चित्र बदलावे लागेल.
-----
-भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त आवश्यक
भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे शहरवासिय हैराण झाले आहेत. महापालिकेने निर्बिजीकरण मोहिम राबवली. पण त्याचे ठोस परिणाम दिसलेले नाहीत. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी पर्याय शोधण्याची प्रामुख्याने जबाबदारी असणार आहे.
------
- पंचगंगा प्रदुषण रोखण्यासाठी उपाययोजना
पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर देण्याची प्राधान्याने जबाबदारी असणार आहे. त्यासाठी सध्या उभारणी करण्यात येत असलेल्या एसटीपी प्रकल्पाला गती देण्यासह नव्याने प्रस्तावित केलेल्या एसटीपीच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करावा लागणार आहे. या शिवाय अन्य छोट्या-मोठ्या उपाययोजनांवर भर द्यावा लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com