टंचाईतील बोअरवेल पडल्या कोरड्या

टंचाईतील बोअरवेल पडल्या कोरड्या

Published on

लोगो ः जिल्‍हा परिषद

टंचाईतील बोअरवेल पडल्या कोरड्या
जिल्‍ह्यातील चित्र; झिंक साठवण टाकीचा पर्याय; जनजागृतीची गरज

सदानंद पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १८ : जिल्‍ह्यातील दुर्गम भागातील धनगरवाडे, वस्‍त्यांवर टंचाईच्या काळात बोअरवेल घेण्यात आल्या; मात्र यांतील अनेक बोअरवेल या टंचाईच्या काळातच कोरड्या पडल्या आहेत, तर काही बोअरवेलचे पाणी कमी झाल्याने तेथील लोकांना इतर स्‍त्रोतांचा आधार घ्यावा लागला आहे. एकूणच टंचाईतील बोअरवेल फार काळ पाणीपुरवठा करू शकत नाहीत. यासाठी तीन, चार महिने पाणीपुरवठा करणा‍ऱ्या झिंक साठवण टाकीचा उपयोग करणे आवश्यक आहे; मात्र टाकीतील पाणी शिळे होते, हा समज असल्याने या टाकीच्या बांधकामाकडे दुर्लक्ष झाले आहे.
पाणी टंचाईतील सर्वाधिक लोकप्रिय योजना म्‍हणून बोअरवेलकडे पाहिले जाते. टंचाईग्रस्‍त भागात अनेक वर्षे या बोअरवेलनी पाण्‍याचा उपसा केला आहे. पाण्याची टंचाई तसेच सातत्याने दुर्भिक्ष्य असणाऱ्या भागातील पाणी भूजल पातळी १८० ते २०० फुटांच्या पुढे आहे. काही ठिकाणी तर ३०० फुटांपेक्षा अधिक खोल बोअरवेल घेतल्या जात आहेत. शासकीय बोअरवेलला मर्यादा असल्याने नोंदी त्याच मर्यादेत होत आहेत. कितीही बोअरवेल घेतल्या तरी टंचाई मात्र कमी होत नाही. त्यामुळे टंचाईबाबत बोअरवेलवरती विसंबून न राहता इतर पर्यायांचा विचार करणे आवश्यक आहे.
शासनाने कायम टंचाई असणा‍ऱ्या वाड्या, वस्‍त्या, गावांसाठी स्‍वर्गीय मीनाताई ठाकरे पाणी साठवण योजना जाहीर केली. यामध्ये वस्‍तीवरील ५०० लोकांना दररोज प्रती माणसी २० लिटरने (टंचाई काळातील नियमानुसार) तीन, चार, पाच महिने पुरेल एवढे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले. या योजनेत जमिनीवर पाण्याची टाकी बांधून त्याला झिंक कोटींग करण्यात येते. रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग येथे ही योजना चांगल्या पद्धतीने सुरू आहे. याच धर्तीवर जिल्‍ह्यातील ८९ वाड्या, वस्‍त्यांसाठी ही योजना घेण्यात आली; मात्र पावसाळ्यात साठवलेले पाणी टंचाईच्या काळात म्‍हणजे मार्च, एप्रिल, मे महिन्यांत शिळे होईल, या विचाराने योजना घेण्यास नकार दिला जात आहे.

चौकट
ग्रामपंचायती, ग्रामस्थांकडून विरोध
पावसाळ्यातील पाणी झिंक टाकीत साठवले जाते. या टाकीतील पाणी शुद्ध राहण्यासाठी क्‍लोरिनेशन (पाणी शुद्धीकरण) व्यवस्‍थाही केली आहे. तरीही ग्रामपंचायती व स्‍थानिक नागरिकांकडून विरोध होत आहे. सध्या ८९ गावांपैकी चंदगड व शाहूवाडी तालुक्यांतील काही वाड्या, वस्‍त्या वगळता कोणीही झिंक टाकीचा प्रस्‍ताव स्वीकारलेला नाही.

कोट
भूजल पातळी सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे टंचाईतील बोअरवेलना पाणी मिळत नाही. त्यातूनही झाले तर ते पाणी फार काळ राहत नाही. वारंवार तीच ती गावे टंचाईत येत आहेत. त्यामुळे झिंक साठवण टाकीचा चांगला पर्याय आहे. कोकणात सर्रास या पाण्याचा पिण्यासाठी टंचाईच्या काळात उपयोग होतो; मात्र जिल्‍ह्यातील डोंगराळ भागात याबाबत प्रबोधन होणे आवश्यक आहे.
-अमित ओतारी, शाखा अभियंता, पाणीपुरवठा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.