
अनुकंपा नियुक्तीत ‘टीईटी’चा अडथळा
शिक्षण सेवक पदातील जाचक अट रद्द करून कुटुंबांना द्यावा आधार
संतोष मिठारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः राज्यात शिक्षण सेवकाच्या अनुकंपा नियुक्तीमध्ये टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्णतेच्या अटीचा अडथळा निर्माण झाला आहे. शासनाच्या इतर कोणत्याही विभागातील अनुकंपा नियुक्तीत अट नसताना शिक्षण सेवकाबाबत असा निर्णय कशाला घेतला आहे, अशी विचारणा शिक्षण क्षेत्रातील वर्तुळातून होत आहे.
शासकीय अथवा निमशासकीय सेवेत असणारा कर्मचारी कोणत्याही कारणास्तव मृत झाल्यास त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू राहण्यासाठी त्याच्या कुटुंबातील व्यक्तीस अनुकंपा तत्वावर नोकरीस घेऊन त्याच्या कुटुंबाला हातभार लावण्याची तरतूद शासनस्तरावर आहे; पण याविषयी शिक्षण विभागाबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाने संभ्रम निर्माण झाला आहे. शिक्षण विभागात अनुकंपा तत्वावर शिक्षण सेवक म्हणून नेमणूक देताना २० जानेवारी २०१६ च्या शासन निर्णयानुसार टीईटी परीक्षा उत्तीर्णतेमधून सवलत दिली होती; मात्र ११ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या शासनाचे अवर सचिव यांच्या पत्रानुसार प्राथमिक, माध्यमिक शाळेतील इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतच्या अनुकंपा तत्वावरील शिक्षण सेवक भरतीसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याचे कळविले आहे. त्यावर शिक्षण क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे.
कोट
अनुकंपा तत्वावर खऱ्या अर्थाने संबंधित कुटुंबाला आधार देणे गरजेचे असते; मात्र टीईटी उत्तीर्णतेसारख्या जाचक अटीमुळे त्या कुटुंबाला आधार कसा मिळणार? इतर विभागात अनुकंपा तत्वावर अशी कोणतीच अट नाही. मग शिक्षण विभागात अशी अट का घातली आहे? ही जाचक अट शिक्षण विभागाने त्वरित रद्द करावी अन्यथा राज्यस्तरीय आंदोलन उभारले जाईल.
-संतोष आयरे, समन्वयक, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना.
२० जानेवारी २०१६ च्या शासन आदेशात काय?
शिक्षण सेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याच्या कार्यवाहीबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २० जानेवारी २०१६ रोजी शासन आदेश काढला आहे. त्यात अनुकंपा तत्वाने शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देताना संबंधित अनुकंपाधारक हा शिक्षण सेवक पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक, व्यावसायिक अर्हताधारण करणारा असावा; मात्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) व केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून त्यास सवलत राहील.
चौकट
११ ऑक्टोबर २०२२ च्या पत्रातील अभिप्राय असा-
शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अवर सचिवांनी राज्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शिक्षण सेवक या पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्ती देताना ग्राह्य धरावयाच्या शैक्षणिक अर्हतेविषयी ११ ऑक्टोबर २०२२ रोजी पत्राद्वारे अभिप्राय दिला आहे. त्यात प्राथमिक शिक्षक पदासाठी टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. २० जानेवारी २०१६ च्या शासन निर्णयाने उद्भवलेली त्रुटी दूर करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षकांची अर्हता ‘एनसीईटी’ने निश्चित केली असून तिचे पालन करणे बंधनकारक आहे. सबब इतर बाबींसोबत अनुकंपा नियुक्ती देताना उमेदवार टीईटी उत्तीर्ण असण्याची दक्षता घ्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.