पावसाची रिपरिप, हुमणी चिडीचिप!

पावसाची रिपरिप, हुमणी चिडीचिप!

18982
गडहिंग्लज : आठवडाभर झालेल्या जोरदार पावसामुळे उसाच्या शेतात पाणी तुंबलेले आहे. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)

पावसाची रिपरिप, हुमणी चिडीचिप!
शेतात तुंबले पाणी; प्रादुर्भाव झाला कमी, पिकांना होणार फायदा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ : गेल्या आठवडाभरात पावसाची रिपरिप सुरू आहे. मॉन्सूनने ओढ दिल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला दिलासा मिळाला आहे. जोरदार पावसाचे पाणी जमिनीतून बाहेर पडले आहे. पिकातही पाणी चांगलेच तुंबले आहे. परिणामी, पिकाला लागलेली हुमणी नष्ट झाली आहे. हुमणीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पिकाला फायदा होणार आहे.
यंदा मॉन्सूनला उशिरा प्रारंभ झाला. जून महिना कोरडाच गेला होता. अगदी जुलैचा दुसरा आठवडा उलटला तरी पावसाची प्रतीक्षा करण्याची वेळ आली होती. शेतकऱ्यांनी धूळवाफ पेरणी आधीच आवरली होती. तर अपुऱ्या झालेल्या पावसावरच अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या आवरल्या होत्या. दरम्यान, उसासह अन्य पिकांना हुमणीचा प्रादुर्भाव दिसू लागला होता. पाऊस नसल्याने तो अधिक वाढू लागला होता. हुमणीकडून पिकांची थेट मूळेच कुरतडली जातात. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. शेतकऱ्यांकडून वापरण्यात येणाऱ्या कीटकनाशकांनाही हुमणी फारशी दाद देत नाही. त्यामुळे एकीकडे पाऊस नसल्याची चिंता तर दुसरीकडे हुमणीचे संकट अशा दुहेरी पेचात शेतकरी सापडले होते.
मात्र, गेल्या आठवडाभरापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वळीव पाऊस झालाच नव्हता. तर मॉन्सूनही लांबला होता. त्यामुळे संततधार असूनही सुरुवातीला तीन-चार दिवस पाणी जमिनीतून बाहेर पडले नव्हते. मात्र, त्यानंतर जमिनीतून पाणी बाहेर पडले. पिकामध्येही ते चांगलेच तुंबले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत उसामध्येही पाणी तुंबलेले दिसू लागले आहे. त्यामुळे जमिनीत असणारी हुमणी बाहेर पडली आहे. तुंबलेल्या पाण्यामुळे हुमणी नष्ट होण्यास मदत झाला आहे. साहजीकच याचा पिकाला फायदा होणार आहे. शिवाय हुमणीच्या उच्चाटनासाठी शेतकऱ्यांना करावे लागणारे कष्ट वाचले आहेत.
-----------
चौकट...
ऊस पडण्याचा धोका...
यंदा वळीव पाऊस बरसलाच नव्हता. शिवाय मॉन्सूनही लांबला होता. हिरण्यकेशीवर उपसाबंदीही लागू केली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पाण्याअभावी उसाची भरणी केली नव्हती. आठवडाभर झालेल्या जोरदार पावसामुळे उसात चांगलेच पाणी तुंबले आहे. त्यामुळे पिकांची मुळे हलकी होतात. तुंबलेल्या पाण्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाली असली तरी वाऱ्याचा जोर वाढल्यास हा ऊस पडण्याचा धोका आहे.
----------
उन्हाळ्यातच करावा बंदोबस्त...
हुमणीची उत्पत्ती भोंग्यापासून होते. साधारण एप्रिल व मे महिन्यात हे भोंगे तयार होतात. यावेळीच शेतकऱ्यांनी शेतात प्रकाश सापळे तयार करणे गरजेचे आहे. मात्र, एखाद-दुसऱ्या शेतकऱ्याने हा प्रयोग करुन उपयोग होत नाही. त्यासाठी आजुबाजूच्या सर्वच शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या प्रकाश सापळे तयार केल्यास भोंगे नष्ट होतात. मात्र, एकदा ही वेळ गेली तर त्यापासून तयार झालेल्या हुमणीचा प्रादुर्भाव रोखणे अडचणीचे ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातच बंदोबस्त करणे अधिक सोईचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com