फिटनेस

फिटनेस

फिटनेसची जागृती
घडवतेय तंदुरुस्ती

एन्र्टो

संतुलित आहार, व्यायामातून आरोग्य तंदुरुस्त होते. दररोजच्या जगण्यात मन प्रसन्न राहण्याबरोबरच क्रय शक्ती टिकून राहते. त्यासाठी आहाराबाबतची जागरुकता वाढली. त्यातून व्यायाम, आहार अधिक शास्त्रोक्त असावा, आरोग्याला हितकारक असावा, याची ओढ वाढते. अशा वेळी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन व्यायाम व आहाराचा समतोल राखला जातो. हीच गरज ओळखून ‘फिटनेस टॅक्टीस’ संकल्पना याही शहरात रुजली आहे. काही सेवाभावी संस्था व काही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यावसायिक अंगाने ‘फिटनेस मार्गदर्शन’ सुरू केले. पहाटे, सकाळी, सायंकाळी विविध वेळांत शरीराला व्यायाम दिला जाऊ लागला तसे अनेकांच्या बेढभ शरिरयष्ठीला आकार येताना सुडौल बांधा व तंदुरुस्त आरोग्याची अनुभूती मिळू लागली आहे.
----------
फार नाही; पण वीस, पंचवीस वर्षांपूर्वी शहरात तालीम होत्या. तेथे किशोरवयीन मुले कुस्तीचा सराव करीत होती. सार्वजनिक स्तरावर तेवढीच व्यायामाची सुविधा होती. अनेक लोक पूर्वीपासून सकाळी फिरणे, कवायती करणे, योगा करणे असा सराव करीत आहेत. या पलीकडे फारशा व्यायामाच्या सुविधा नव्हत्या. याच काळात मुंबई-पुण्यासारख्या शहरात व्यायाम शाळा संकल्पना आली. महापालिकेनेही येथे चार-पाच प्रभागांत मिळून एक अशी व्यायामशाळा १९८५ च्या काळात सुरू केली. तेव्हाची तरुणाची एक पिढी व्यायाम शाळेत जावून तंदुरुस्त देहयष्ठी घडवू लागली. त्याच व्यायाम शाळांचा प्रतिसाद वाढला आणि पुढे १९९८ नंतर जिमही संकल्पना आली. त्याला व्यावसायिक रूप आले. याच काळात पुण्या- मुंबईतील तज्ज्ञ व्यायाम प्रशिक्षकही येथे येऊ लागले. त्यांना पंधरा- वीस हजार रुपये मानधनात जिममध्ये ट्रेनर म्हणून नियुक्ती झाल्या. त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतलेले काही शिष्य पुढे फिटनेस ट्रेनर म्हणून तयार झाले. त्यांनी बॉडी बिल्डिंग किंवा जिम सुरू केले. आज शहरात अलिशान दर्जाच्या जवळपास ४० भर जिम आहेत. उंची इमारतीत आलिशान फर्निचर, अत्याधुनिक व्यायाम साधने, कार्पोरेट लुकमधील जिम सुरू झाल्या. महिलांसाठी स्वतंत्र बॅचेची व्यवस्था झाली. गृहिंणीपासून ते उच्चाधिकारी असलेल्या महिलांही जिममध्ये व्यायामाला येऊ लागल्या. पुढे हाच ट्रेंड अधिक विस्तारात गेला.
याच वेळी सुडौल बांधा, त्यासाठी व्यायामाला पूरक खाद्य अशा प्रकारच्या जाहिराती व चर्चासत्र, आरोग्यविषयक सल्ला, तज्ज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती यातून एकाच वेळी व्यायाम व आहाराचे महत्त्‍व इतके सांगितले गेले की, त्यातून अनेकांना व्यायाम आहाराचे महत्त्‍व पटू लागले आहे. अनेकांनी एरव्ही घरात केला जाणारा व्यायाम मैदानात सुरू झाला. मैदानातील व्यायाम, साधने असलेल्या जिममध्ये सुरू झाला. तेव्हा जिमचा ट्रेंड सर्वत्र वाढला.
२००५ नंतर सिक्स पॅक संकल्पना चर्चेत आली. विशेष तरुणाईमध्ये ‘सिक्स पॅक’चे आकर्षण वाढले. ट्रेनरनी ठराविक वयात ठराविक प्रकारचा व विशिष्ठ वेळेत केला जाणारा व्यायाम, आहाराचे संतुलन, ठराविक खाद्य पदार्थ खाण्यावर व काही पदार्थ वर्ज्य करण्यावर भर दिला गेला. अशा संकल्पना व्यक्तीगत पातळीवर समजून देत अनेक तरुणांची सिक्स पॅक्ससह बलदंड देहयष्ठी बनवली. ही बाब अधिक शास्त्रीय पद्धतीने वैद्यकीय तज्‍ज्ञांच्या सल्ल्याने करण्याबाबत दक्षताही बाळगली गेली.
याच जोडीला समांतरपणे योग प्रशिक्षण वर्गही सुरू आहे. योग प्रशिक्षण वर्ग उपनगरात सुरू झाले. योग प्रशिक्षण घेतले गुरू काही ठिकाणी मार्गदर्शन करीत आहे. याच काळात हास्ययोग चळवळ जोरात सुरू झाली. त्यालाही उत्तम प्रतिसाद लाभला. शहरातील जवळपास ४४ ठिकाणी हास्य क्लब सुरू झाले. जवळपास २५ हजारांहून अधिक व्यक्ती क्लबला जोडल्या गेल्या. हास्यामुळे स्नायूवरील ताण कमी होतो. रक्तदाब नियंत्रणात राहतो, असा अनुभव काहीनी घेतला. त्यांनी नियमितपणे हास्य योग सुरू केला. यातून हास्य योगाचा प्रसारप्रचार वाढू लागला.
या सोबत सकाळी स्वतःहून फिरायला येणारा तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फिरायला येणाऱ्यांची गर्दी असते. अनेक उद्याने, पदपथ तसेच रस्त्याने अनेकजण चालत जातात. एखाद्या मैदानात किंवा मोकळ्या जागेत कवायतीसारखा व्यायाम करतात. आपल्या आरोग्याची काळजी घेतात. यातही अनेकजण व्याधीग्रस्त आहे तर काहीजण व्याधी नको म्हणून खबरदारी म्हणून व्यायाम करणारे आहेत.
व्यायामाबाबत जागृती सर्वच वयोगटात वाढली. जिम असो वा खासगी मैदानात व्यायाम करणाऱ्यांची वाढती गर्दी मानवी आरोग्य तंदुरुस्ती जागृती ठळक करीत आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढ्या अधिक निरोगी होण्यास मदत होत आहे.

सल्ला घेऊनच
डॉ. अनिकेत पाटील म्हणाले, ‘‘संतुलित आहार विहार आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी उपयोगी पडतो; मात्र वयोगट, आरोग्याची स्थिती, व्याधीची तीव्रता तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासून घेऊन व्यायाम करणे अधिक चांगले. काहीवेळा स्वतः हून अतिव्यायाम केला जातो. यातून एखाद्या स्नायूची गुंतागूंत वाढते किंवा त्याचा आरोग्यवर विपरित परिणाम घडू शकतो. त्यामुळे कोणताही व्यायाम कितपत करावा, या विषयी तज्ज्ञ डॉक्टर व व्यायाम प्रशिक्षक यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सूचनेनुसार व्यायाम करण्याला प्राधान्य देणारा वर्ग वाढतो आहे, ही सकारात्मक बाब आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com