महापूर नियंत्रण समिती

महापूर नियंत्रण समिती

Published on

आलमट्टी विसर्ग वाढीने
कोल्हापूरचा धोका कमी

कृष्णा महापूर नियंत्रण समिती; सव्वा लाख क्युसेक विसर्ग सुरू

कोल्हापूर , ता. २६ ः कोल्हापुरातील पुराचा धोका टाळण्यासाठी आलमट्टी धरणातून विसर्ग वाढवावा, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार सतेज पाटील तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली होती. तहसीलदारांना आज निवेदनही दिले होते. त्यानुसार पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाला. याचा परिणाम म्हणून आलमट्टी धरणातून एक लाख २५ हजार क्युसेक्स विसर्ग सुरू झाला. त्यामुळे कोल्हापुरातील महापुराचा धोका कमी होणार आहे, अशी माहिती महापूर नियंत्रण समितीने दिली.
केंद्रीय जल आयोगाच्या सूचनेनुसार आलमट्टी धरणाची पातळी ३१ जुलैपर्यंत ५१३ मीटर असावी, अशी अपेक्षा होती, मात्र अपेक्षित विसर्ग नव्हता. याच वेळी कोल्हापूर, सांगली, सातारा धरण पाणलोट व मुक्त पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यानंतर कृष्णा, पंचगंगा, नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडून फुग आली. या काळात आलमट्टी, हिप्परगी धरणाचे दरवाजे उघडावेत तसेच आलमट्टीतून विसर्ग वाढवावा, यासाठी समितीने पाठपुरावा केला. त्यानंतर झालेल्या हालचालीनंतर आलमट्टी धरणातून दिवसात तीनवेळा विसर्ग वाढवला आहे. त्यानुसार एक लाख २५ हजार क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कृष्णेचे पाणी, पंचगंगेचे पाणी वेगाने पुढे सरकते. त्यामुळे पुराची पाणी पातळी दोन दिवसांत कमी होईल, असा दावाही समितीने केला.
जुलैमध्ये आलमट्टीची पातळी ५१६ मीटरपेक्षा जास्त होती. वास्तविक पातळी ५१३ मीटर ठेवणे अपेक्षित होते. समितीच्या प्रतिनिधींनी पाटबंधारे विभागाकडे रोजची आकडेवारी मिळवून घेत आलमट्टीसह कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील धरणाचा पाणीसाठा पातळी नोंद करून घेत वेळोवेळी विश्लेषण केले. त्यानुसार अलमट्टीची पातळी जास्त असल्याने पंचगंगा, कृष्णा नदीच्या पाण्याला फुग येत असून कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण झाली हे लक्षात येताच अलमट्टीचा विसर्ग वाढविण्याची मागणी समितीचे सर्जेराव पाटील, धरणसाठा अभ्यासक विजयकुमार दिवाण यांनी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.