स्वसंरक्षण कार्यशाळा

स्वसंरक्षण कार्यशाळा

20088

युवतींनी आत्मसात केले स्वसंरक्षणाचे डावपेच
‘सकाळ’च्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त कॉमर्स कॉलेजमध्ये कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ : स्वसंरक्षणाचे डावपेच आत्मसात केल्यानंतर युवतींचा उत्साह आज दुणावला. कोणी छेड काढायचा अवकाश, त्याला जशास तसे उत्तर देण्याचा निर्धारच त्यांनी केला. लढायला जशी मानसिकता लागते, तशी छोटी शस्त्रे कशी काम करू शकतात, याचा दाखलाच त्यांनी दिला. निमित्त होते ‘सकाळ’च्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्टतर्फे आयोजित स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यशाळेचे. कॉमर्स कॉलेजमध्ये ही कार्यशाळा झाली.
कॉलेजमध्ये प्राध्यापक वर्ग अभ्यासक्रमातील धडे रोज शिकवतात. आज वेगळे काहीतरी शिकायला मिळणार, या भावनेने मुली कॉलेजमधील हॉलमध्ये जमल्या. वुशू प्रशिक्षक सतीश वडणगेकर यांनी स्वसंरक्षणासाठी नेमके काय करावे, याचे मार्गदर्शन केले. सहप्रशिक्षक मधुरा मगदूम, स्नेहा सरनाईक, वैभवी दंडगे, समृद्धी कुंभार, नंदिनी माजगावकर, राहत सरगूर यांनी मुलींना हल्ल्यानंतर प्रतिहल्ला कसा करायचा, याचे प्रात्यक्षिक दाखवले. वडणगेकर यांनी खेकडा पीन, सेफ्टीपीन, पाण्याची बॉटल, पेन, मोबाईल, ओढणी, नोटबुक, कंगवा, छत्री, आयडेंटीटी कार्ड, स्प्रे, ओढणीचा वापर करून हल्लेखोरांना कसा धडा शिकवायचा, याची माहिती दिली. तसेच वुशू, लाठी-काठी, तायक्वाँदो, मुष्टीयुद्ध प्रकारांत मुलींचा टक्का वाढला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर मुलींनी विविध प्रकारांत स्वसंरक्षणाचे तंत्र आत्मविश्‍वासाने आत्मसात केले. येणाऱ्या संकटांना मुकाबला करण्याचे धैर्य मिळाल्याचे मुलींनी सांगितले. यावेळी उपप्राचार्य डॉ. आर. एस. नाईक उपस्थित होते. प्रा. शमिका मुठाणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मेघा महाडिक यांनी आभार मानले.

कोट
‘सकाळ’च्या वर्धापन दिनानिमित्त वुशू असोसिएशनने केलेला उपक्रम स्तुत्य आहे. सोशल मीडियाच्या जमान्यात स्वसंरक्षण कसे करायचे, याचे भान हरवले आहे. मुलींनी तर स्वसंरक्षणाचे धडे गिरवायला हवेत. ही संधी वुशू असोसिएशनने उपलब्ध करून दिली. ज्यामुळे मुलींतील आत्मविश्‍वासाला बळ मिळाले आहे.
- डॉ. आर. एन. नाईक, उपप्राचार्य

कोट
छोट्या गोष्टीतून स्वसंरक्षण करता येते, हे आज आम्हाला कळाले. महिला अबला नसून, ती सबला आहे. तिला स्वत:चे संरक्षण करता आले पाहिजे. श्री. वडणगेकर यांनी आमच्यातील ऊर्जेला फुंकर दिली आहे. आमच्यात लढण्याची बीजे रुजली आहेत.
- दुर्वा सावंत, विद्यार्थिनी, बी. कॉम. भाग-२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com