वारसा फक्त नावाला, रुपाया नाही संवर्धनाला
बिग स्टोरी...
24066
वारसा फक्त नावाला
रुपया नाही संवर्धनाला
हेरिटेज वास्तूंकडे दुर्लक्ष; निधीची नाही तरतूद
शहरात ७६ वारसा वास्तू (हेरिटेज बिल्डिंग) आहेत. मात्र त्याच्या संवर्धनासाठी महापालिकेने आर्थिक तरतूद केलेली नाही. एकीकडे पालकमंत्री दीपक केसरकर ‘हेरिटेज स्ट्रीट'' बनवण्याचा मानस व्यक्त करतात. मात्र दुसरीकडे आहे त्या वास्तूंच्या संवर्धनासाठी एक रुपयाही दिला जात नाही. त्यामुळे समृद्ध संस्कृतीच्या खुणा दाखवणाऱ्या या वास्तू काळाच्या पडद्याआड जाण्याचा धोका आहे.
- ओंकार धर्माधिकारी
...................
शहरातील वारसा वस्तू म्हणजे केवळ एक इमारत नाही तर ती वस्तू अनेक गोष्टी कथन करत असते. कधी ती ऐतिहासिक घटनेची साक्ष देते तर कधी त्या वास्तूच्या शैलीमधून दोन संस्कृतींचा मिलाफ दिसतो. मेन राजाराम हायस्कूलसारखी इमारत १५० वर्षांपूर्वीची शाळा दाखवते. समाजातील अनेक धुरिणांच्या सहवासाने पावन झालेली ही इमारत लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचा शिक्षणाकडे पाहण्याचा प्रगल्भ दृष्टिकोनही दाखवते. शहरातील विविध पॅलेस वैभवाच्या खुणा आहेत. काही बंगले, वाडे खासगी आहेत, त्यांची कलाकुसरही मोहवणारी आहे. अशा असंख्य वारसा इमारती अवतीभोवती असून त्यांचा समावेश हेरिटेज ग्रेड १, २, ३ गटांमध्ये झाला आहे. या वास्तुंच्या संवर्धनासाठी निधीची तरतूद करण्याची व्यवस्थाही केली गेली आहे. महापालिकेला बांधकाम परवान्यातून वर्षाला जी रक्कम मिळते त्यातील २ टक्के रक्कम हेरिटेज वास्तूंच्या संवर्धनासाठी करावी लागते. मात्र महापालिकेकडे बजेट हेड नसल्याने ही रक्कम हेरिटेज वास्तुंच्या संवर्धनावर खर्च झालेली नाही. काही वास्तूंमध्ये शासकीय कार्यालये आहेत, मात्र त्यांचीही दुरवस्थाच आहे. त्यामुळे नुसत्या घोषणा न करता हेरिटेज वास्तू संवर्धनासाठी निधी देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा वास्तूंच्या रुपाने अस्तित्वात असणारा वारसा काळाच्या ओघात संपुष्टात येईल. शालिनी सिनेटोन झाला तसा...
हेरिटेज वास्तूच्या संवर्धनासाठी...
- वास्तूची सर्व माहिती संकलीत व्हावी.
- वास्तूची डागडुजी नियमावलीप्रमाणेच करावी.
- वास्तूचे महत्त्व लक्षात येण्यासाठी दर्शनी भागात फलक लावावेत
- शहरात येणाऱ्या पर्यटकांना वास्तू पाहता याव्यात.
- वास्तूंची देखरेखीसाठी व्यवस्था उभारावी.
‘रंकाळ्या‘चे सौंदर्य टिकावे
रंकाळा तलावदेखील वारसा स्थळांच्या यादीमध्ये येतो. पूर्वी त्याची डागडुजी करताना खबरदारी घेतली गेली नाही. त्यामुळे रंकाळा तलावाच्या कठड्यांची मूळची रचना टिकली नाही. आता रंकाळ्याचा संवर्धन आराखडा केला आहे. या कामावेळी हेरिटेज नियमावलीचे पालन केले पाहिजे.
वारसा वास्तूंचे माहिती संकलन नाही
शहरातील वारसा वास्तूंचे माहिती संकलन आवश्यक आहे. यामध्ये वास्तूची मालकी कोणाची, जागेचा आकार किती, ऐतिहासिक महत्त्व काय, वास्तूमधील वस्तू, त्याची स्थापत्य शैली यांची माहिती एकत्रीत करणे आवश्यक आहे. ही माहिती संकेतस्थळावर दिली पाहिजे. यासाठी हेरिटेज कमिटीने प्रस्तावही पाठवला होता. मात्र महापालिका प्रशासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही.
-----------------------------------
‘हेरिटेज वॉक'' आवश्यक
वारसा वास्तूंची देखभाल दुरुस्ती करून या वास्तू पर्यटकांसाठी खुल्या केल्या पाहिजेत. तिकिटाच्या माध्यमातून महापालिकेला महसुलाचे नवा स्त्रोत उपलब्ध होईल. याची सुरुवात नागरिकांच्या हेरिटेज वॉकच्या माध्यमातून झाली पाहिजे. त्यातून शहरातील नागरिकांनाही हेरिटेज वास्तूंची माहिती होईल.
.................
चौकट
हेरिटेज समितीला मुहूर्त कधी?
वारसा वास्तूंचे जनत करण्यासाठी हेरीरिटेज समिती असते. या समितीचे मुदत संपून सात महिने झाले आहेत. मात्र अद्याप नवीन समिती अस्तित्वात आलेली नाही. समिती सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येते.
कोट
शहरातील विविध वारसा वास्तू आपला इतिहास सांगतात. त्यामुळे त्यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. मात्र महापालिका प्रशासनाने संवर्धनासाठी आर्थिक तरतूद केलेली नाही. संवर्धनासाठी कृती आराखडा बनवून त्याची अंमलबजावणी केली गेली पाहिजे.
- उदय गायकवाड, (ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ व हेरिटेज समिती सदस्य)
शहरातील ऐतिहासिक वास्तू या अप्रत्यक्षपणे त्या परिसराचे सौंदर्य वाढवतात. ऐतिहासिक वास्तूच्या अनुषंगाने तो परिसर सुशोभीत करता येतो. या दृष्टिकोनातून या वास्तूंचा विचार व्हावा.
- अजय कोरणे (अध्यक्ष, इंजिनिअरिंग अँड आर्किटेक्ट असोसिएशन)
ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी आणि अभ्यासण्यासाठी अनेक पर्यटक, अभ्यासक देशोदेशी फिरत असतात. कोल्हापुरातील वैभवशाली वारसा या वास्तूंच्या रुपाने त्यांना अनुभवता येणार आहे. शहरांतर्गत पर्यटनवाढीठी वारसा वास्तू जपणे आवश्यक आहे.
- कृष्णराज माळी (पर्यटन अभ्यासक)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

