मातीच्या राख्या
24221
यंदा बहीण बांधणार ‘मृद बीजांकूर’ राखी
मातीपासून बनविल्या राख्या : गौरव काईंगडे यांची प्रयोगशीलता
नंदिनी नरेवाडी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः राखी केवळ बहीण भावाच्या प्रेमाचा धागा गुंफते असे नाही तर त्यांच्या प्रेमाचे रोपटेही फुलवू शकते, अशी राखी येथील काही हौशी कलाकारांनी बनवली आहे. या मऊ-मुलायम मातीत भाजीपाल्याच्या बिया गुंफल्या आहेत. रक्षाबंधनानंतर ही राखी फेकून न देता ती राखी फक्त कुंडीत ठेवायची. आणि काही दिवस पाणी घातले तरी त्या बियांमधून उमलणारे रोपटे भविष्यात मोठे होईल. मातीपासून बनविलेली ही राखी यंदाच्या रक्षाबंधनात आकर्षण ठरणार आहे. टेराकोटा जर्नीच्या गौरव काईंगडे यांनी या राख्या बनवल्या आहेत.
गेल्या काही वर्षात पारंपरिक राखीबरोबर आधुनिक तसेच तंत्र कौशल्याचा वापर करून मनोहरी राख्या बनवल्या जात आहेत. त्याचा अधिक आत्मीयतेने वापर केला जात आहे. मात्र, दोन वर्षांपासून निसर्गपूरक राख्या तयार केल्या जाऊ लागल्या आहेत. या राख्यांना भाजीपाल्यापासून वनौषधी झाडे यांच्या बिया वापरल्या जातात. अशा बियांपासून बनवलेल्या सुंदर सुबक राख्या रक्षाबंधनाला निसर्गाशी बंधुत्वाचे नाते अधिक दृढ करणाऱ्या ठरतात. यंदा, मात्र यापुढचे पाऊल टाकत साध्या मातीपासून आकर्षक या राख्या बनविल्या आहेत.
मातीच्या राख्या कलात्मकता, कल्पकता व सौंदर्य अशा गुणवैशिष्ट्यांनी सजल्या आहेत. अनेकजण आपल्या बुद्धी कौशल्याला ताण देऊन विविध गुणवैशिष्ट्ये सजलेल्या राख्या तयार करतात. त्या आकर्षक तितक्याच टिकाऊ असतातच. मात्र, गौरव काईंगडे यांनी बनविलेली ही मृद बिजांकूर राखी निसर्गासोबत बंधुत्वाचे नाते निर्माण करणारी आहे. रोटरी क्लबच्या पुढाकारातून या राखीची संकल्पना पुढे आली आहे. त्यांच्यातर्फे या राख्या पोलिसमित्र, सफाई कर्मचारी, सीमेवरील जवानांसाठी पाठविल्या जाणार आहेत.
------
कोट
गेल्यावर्षी टेराकोटापासून राख्या बनविल्या होत्या. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. यंदा साध्या मातीपासून या राख्या बनविल्या असून, ही राखी भाजीव नाही आहे. या मातीच्या राखीत गवारी व तुळशीच्या बिया घातल्यामुळे रक्षाबंधनानंतर ही राखी कुंडीत ठेवल्यास रोपटे फुलणार आहे.
- गौरव काईंगडे
23960
चौकट
फॅन्सी राखीलाही पसंती
अवघ्या पंधरा दिवसांवर आलेल्या रक्षाबंधनाच्या सणानिमित्ताने बाजारपेठही नानाविध राख्यांनी व्यापली आहे. फॅन्सी स्टोन, कुंदन, डायमंड, मोती, कपल राखी अशा पारंपरिक राख्यांसोबत फॅशनेबल राख्याही बहिणींकडून पसंत होऊ लागल्या आहेत. चिमुकल्यांसाठी लायटिंग राख्या, छोटा भीम, डोरेमॉन, मोटू पतलु, श्रीगणेशा, श्रीकृष्ण अशा कार्टुनमधील राख्याही उपलब्ध आहेत. तसेच गोंड्यांच्या पारंपरिक राख्यांनाही मोठी मागणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

