

मालिका लोगो ः गुंता प्लास्टिक प्रदूषणाचा- भाग तीन
............
फोटो ः 24286
-
वाहतूक खर्च ठरणार कळीचा मुद्दा
संकलित प्लास्टिक प्रक्रिया केंद्रापर्यंत आणण्यासाठी हवे ठोस व्यवस्थापन
संभाजी गंडमाळे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः जिल्ह्यातील बारा ठिकाणी प्लास्टिक प्रक्रिया केंद्रे होणार असली तरी तालुक्यातील विविध ठिकाणाहून या केंद्रापर्यंत संकलित प्लास्टिक आणण्यासाठीचा वाहतूक खर्च भविष्यात कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे त्याचे नियोजन अगोदरपासून करावे लागणार आहे. किंबहुना या प्रकल्पांकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहिले नाही तर ही प्रक्रिया केंद्रेच अल्पावधीतच मोडकळीस येण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या नियोजनानुसार बारा तालुक्यातील बारा मोठ्या गावात हे प्रकल्प असतील. प्रत्येक गावातून किंवा क्लस्टरनिहाय प्लास्टिकचे संकलन होईल आणि हे प्लास्टिक पुढील प्रक्रियेसाठी प्रक्रिया केंद्रामध्ये आणले जाईल. पण, एकूण प्लास्टिकचे संकलन, त्याची किंमत आणि ते प्रक्रियेसाठी आणण्यासाठीच्या वाहतूक खर्चाचा ताळमेळ बसणे अशक्य आहे. असे झाल्यास ग्रामपंचायतीकडूनही नंतरच्या काळात प्रक्रिया केंद्र चालवण्यासाठी टाळाटाळ होण्याची शक्यता आहे.
असाही पर्याय असू शकतो...
प्रत्येक गावाला बेलिंग मशीन देणे शक्य नाही. मात्र, प्रक्रिया केंद्रातील बेलिंग मशीनच जर मुव्हेबल केले तर प्रत्येक गावातून बेलिंग केलेले प्लास्टिकचे गठ्ठे संकलित करता येणे शक्य आहे आणि बेलिंग केलेल्या प्लास्टिकच्या गठ्ठ्यांना टॅगींगही करता येते. आहे तशा स्थितीतील प्लास्टिक उचलून त्याचे संकलन करण्यासाठी हा पर्याय प्रभावी ठरेल, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
शहरातील असेही प्लास्टिक संकलन
कुठल्याही शहरात किंवा गावात बहुतांश ठिकाणी नागरिक वर्गीकरण न करता उघड्यावर कचरा टाकतात. तर अनेक ठिकाणी प्लास्टिकचा कचरा जाळला जातो. वर्गीकरण न केलेला कचरा डम्पिंग ग्राऊंडवर गेल्यामुळे उपयुक्त प्लास्टिकवर प्रक्रिया न होताच ते जाळून नष्ट केले जाते. त्यातून बाहेर पडणाऱ्या घातक वायूंमुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण होतात आणि पर्यावरणाला गंभीर स्वरुपाची हानी पोचते. सिंगल युज प्लास्टिक, छोटे रॅपर्स गोळा न झाल्याने ते ओढे नाल्यात मिसळून, अडकून राहिल्याने कमी पावसातही पुराची स्थिती ओढवल्याचे अनुभव ताजे आहेत. या पार्श्वभूमीवर किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड या कंपनीच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमातून बॅटरीवर चालणारे आणि चार्जिंग करता येणारे व्हॅक्यूम क्लीनर मशिन अवनि संस्थेला नुकतेच दिले. या माध्यमातून शहरातील वर्दळीच्या ठिकाणचा प्लास्टिक कचरा संकलित करून तो प्रक्रियेसाठी पाठवला जातो. विविध कॉर्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमातून ग्रामीण भागातही अशा पध्दतीने प्लास्टिक संकलन शक्य आहे.
पाचगावकरांचा असाही आदर्श
पाचगाव परिसरातील काही सजग नागरिकांनी एकत्र येवून तीन वर्षापूर्वी ‘प्लास्टिक रिसायकल प्रोजेक्ट'' या नावाने एक व्हॉटस् ॲप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपमधील मंडळी महिन्यातून एकदा गावातून सर्व प्रकारचे प्लास्टिक संकलित करतात आणि ते ग्रामपंचायतीने दिलेल्या एका गाळ्यामध्ये एकत्र करतात आणि तो अवनि संस्थेकडे प्रक्रियेसाठी देतात. या उपक्रमामुळे ग्रामस्थांनाही प्लास्टिक कचरा वेगळा ठेवण्याची सवय लागली आहे.
(क्रमशः)
............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.