ठेकेदारामुळे निर्बिजीकरणाला मिळाला ‘खो’
संग्रहित छायाचित्र
-------------
ठेकेदारामुळे निर्बिजीकरणाला मिळाला ‘खो’
फेरनिविदा प्रक्रियेत गेला वेळ : गडहिंग्लजमधील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न कायम
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १८ : शहरातील मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची निविदा पालिका दरवर्षी काढते. चालू आर्थिक वर्षासाठीही निविदा काढून ठेकेदारही निश्चित झाला होता. परंतु त्याने तांत्रिक कारण पुढे करत हे काम नाकारले. यामुळे पुन्हा पालिकेने काढलेली निविदा भरण्याची मुदत शुक्रवारी (ता. १८) संपली. आता या निविदेद्वारे ठेकेदार निश्चित झाल्यानंतर निर्बिजीकरणाला मुहूर्त मिळणार आहे.
शहरात अलीकडील काही वर्षापासून मोकाट कुत्र्यांच्या संख्येत भरच पडत आहे. दरवर्षी पालिकेला निर्बिजीकरण व लसीकरण मोहिम राबवावी लागते. त्यानंतर काही महिने ही कुत्री कमी होतात. पुन्हा जुन-जुलैपासून भटक्या कुत्र्यांचा वावर वाढतो. यामुळे दरवर्षीच निर्बिजीकरणाची मोहिम पालिका राबवत असते. चालू आर्थिक वर्षातही पालिकेने निर्बिजीकरणाची निविदा प्रसिद्ध केली. त्यातून कराडमधील एका संस्थेला ठेकाही दिला. दरम्यान, दोन महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांची संख्या वाढून त्याचा उपद्रव नागरिकांना होवू लागला. शहरात सुमारे ५०० हून अधिक भटकी कुत्री असण्याची शक्यता आहे. या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी वाढू लागल्याने पालिकेने वर्क ऑर्डर देण्यासाठी संबंधित ठेकेदाराला बोलावूनही घेतले. परंतु त्या ठेकेदाराने संस्थेची तांत्रिक अडचण पुढे करत ऐनवेळी हे काम नाकारले. यामुळे पुन्हा या महिन्यात निविदा प्रसिद्ध केली. त्याची मुदत आजच संपली. आता याद्वारे निश्चित होणाऱ्या ठेकेदाराकडून निर्बिजीकरणाचे काम सुरु होणार आहे.
तत्पूर्वी, गुरुवारी एका पिसाळलेल्या कुत्र्याने अवघ्या तासाभरात २० हून अधिक नागरिकांना जखमी केले. यामुळे मोकाट कुत्र्यांची दहशत अधिक पसरली. पालिकेने तत्काळ ठेका निश्चित करुन निर्बिजीकरण व लसीकरणाची मोहिम राबवावी. भितीच्या वातावरणामुळे लहान मुलांना बाहेर सोडणे मुश्किलीचे बनले असून मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिकांनाही या कुत्र्यांचा धोका आहे. यामुळे पालिकेने वॉर पुटींगवर ही मोहिम हाती घेवून मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवापासून नागरिकांची सुटका करण्याची अपेक्षा आहे.
-----------------
शिळे अन्न कुठेही नको
पालिकेच्या घंटागाड्या गल्लोगल्ली घरापर्यंत आणि हॉटेल व्यावसायिकांच्या दारात जावून शिळे अन्न व इतर कचरा संकलीत करतात. परंतु, शहरात अजूनही काही ठिकाणी शिळे अन्न पडलेले दिसते. काही ओढ्याच्या ठिकाणी खराब मांसही टाकले जाते. यामुळेच भटक्या कुत्र्यांच्या संख्येत भर पडत आहे. परिणामी, काहीवेळा खायला काहीच मिळत नसल्याने ती आक्रमक होवून नागरिकांवर हल्ले करीत असल्याचे सांगितले जाते.
------------------------------------------
पहिल्या निविदेतून निश्चित झालेल्या ठेकेदाराने नकार दिल्यामुळे पुन्हा निविदा प्रक्रियेत वेळ गेला. आता निश्चित होणाऱ्या ठेकेदाराकडून नियमानुसार शास्त्रोक्त पद्धतीने निर्बिजीकरण व लसीकरण मोहिम सुरु करु.
- स्वरुप खारगे, मुख्याधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.