रस्ते कामांना गती

रस्ते कामांना गती

महापालिका लोगो

आता मंजूर रस्त्यांच्या कामांना प्राधान्य
के. मंजुलक्ष्मी ः नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्य रस्त्यांचे पॅचवर्क सुरू

कोल्हापूर, ता. १३ ः पॅचवर्कच्या कामांना सुरूवात केली आहे. आता विविध निधींमधून मंजूर झालेल्या शहरातील रस्त्यांच्या कामांना प्राधान्याने सुरूवात केली जाणार आहे, अशी माहिती प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिली. के. मंजुलक्ष्मी यांनी कार्यभार स्वीकारून सव्वा महिना होत आहे. या कालावधीत त्यांनी विविध विभागांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी आज प्रथमच पत्रकार परिषद घेतली.
त्या म्हणाल्या, ‘खराब रस्त्यांची सुधारणा करण्याचे नियोजन केले आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्य रस्त्यांचे पॅचवर्क करण्यास सुरूवात केली आहे. यापूर्वी शासनाच्या विविध योजनांमधून रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजूर झाला आहे. ज्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांची कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच उर्वरित कामांना गती दिली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात मोठ्या संख्येने विविध ठिकाणच्या रस्त्यांची कामे होताना दिसतील. राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियानातून घेण्यात येणाऱ्या ई-बसचा निधीही रस्त्यांकडे वळवला आहे.’
कचरा उठावसाठीच्या टिप्पर दुरूस्तीची मे-जून वगळता इतर सर्व प्रलंबित बिले दिली आहेत. त्यामुळे आज १३२ टिप्पर कामावर होते. सध्या पाच इलेक्ट्रिक टिप्पर सीएसआरमधून मिळाले आहेत. आणखीही टिप्पर लागणार आहेत. त्यादृष्टीने प्रस्ताव केला जात आहे. नवरात्रीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने १२ ठिकाणे निश्‍चित केली आहेत. तेथे स्वच्छता तसेच इतर सुविधा दिल्या जाणार आहेत. चार फिरती शौचालये ठेवण्यात येणार आहेत. प्लास्टिक बंदीबरोबरच अतिक्रमण हटावबाबत कृती आराखडा तयार केला जाणार आहे. फेरीवाला कायद्याप्रमाणे समिती स्थापन केली असल्याचे के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, जलअभियंता नेत्रदिप सरनोबत, सहायक आयुक्त संजय सरनाईक उपस्थित होते.

चौकट
‘थेट पाईपलाईन योजना पूर्ण क्षमतेने
कार्यान्वित करण्याचे प्रशासनाचे लक्ष्य’

४९ किलोमीटरच्या पाईपलाईनची चाचणी झाली आहे. वीजवाहिनीचीही चाचणी झाली आहे. दोन पंप बसवले आहेत. कनेक्शन सुरू करण्याचा अर्ज दिला आहे. ते मिळताच पंप सुरू केले जातील. बहुतांश कामे होत आली आहेत. त्यामुळे लवकरच पाणी उपसा करता येणार आहे. त्यानंतर मात्र स्काडा यंत्रणेच्या चाचणीसाठी १५ दिवस लागणार आहेत. त्यानंतर पूर्ण क्षमतेने योजना कार्यान्वित होणार आहे. थेट पाईपलाईन योजना जरी सुरू झाली तरी आपत्तकालीन स्थितीसाठी एक उपसा केंद्र पर्याय म्हणून ठेवावे लागणार आहे. त्याचे नियोजन केले आहे, असे के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.

चौकट
अनुकंपा तत्वावर १४ वारसांना मंजुरी
अनुकंपा तत्वावरील नेमणूक प्रलंबित असलेल्या १४ वारसांना नोकरी देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. महिनाभरात शारीरीक फिटनेस व पोलिस चौकशीनंतर त्यांना नेमणूक दिली जाणार असल्याचे प्रशासकांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com