दिवसा आड पाणी

दिवसा आड पाणी

दिवसाआड पाण्याचे नियोजन सणांनंतर?
नागरिकांत असंतोष निर्माण होण्याची भीती ः महापालिका प्रशासनाचा पुनर्विचार सुरू

कोल्हापूर, ता. १३ ः शहराभोवतीने पंचगंगा नदी वाहत असताना आतापर्यंत स्वच्छ, मुबलक पाण्यासाठी संघर्ष होता. आता त्यात कमी पावसाची भर पडल्याने ऑक्टोबरमध्येच दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. ऐन सणात ही टंचाई निर्माण होऊन नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होण्याची भीती असल्याने दसरा-दिवाळीनंतर दिवसाआड पाण्याचे नियोजन राबवण्याचा विचार प्रशासन करत आहे. त्याबाबत पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाचे पुनर्नियोजन केले जात आहे.
पावसाळा ऑक्टोबरमध्ये संपला तरी नदींमध्ये पाणी कमी पडत नव्हते. त्यामुळे डिसेंबरनंतर धरणांतून पाणी सोडण्याची गरज भासत होती; पण यंदा पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. धरणे भरली तरी ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढत असल्याने शेतीला पाणी द्यावे लागत आहे. परिणामी, ऑक्टोबर संपण्यापूर्वीच धरणातून पाणी सोडण्याची गरज भासत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठ्याचा विचार करता बालिंगा, नागदेववाडी ही भोगावती नदीवरील व पंचगंगा नदीवरील शिंगणापूर उपसा केंद्र सध्या नदीतील पाणी पातळी कमी होत असल्याने अनेकदा तास-तासभर बंद पडत आहेत. परिणामी, पाणी उपसा कमी होऊन अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी मिळण्याची समस्या निर्माण होत आहे. पाणीपातळीत आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमी दाबाने पाणी मिळण्याचा प्रश्‍न अनेक ठिकाणी निर्माण होऊ शकतो. यामुळेच बालिंगा केंद्रातून ज्या भागात पाणी दिले जाते, तिथे दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन केले आहे.
ही स्थिती आगामी काळात वाढण्याची शक्यता आहे. थेट पाईपलाईनच्या पाण्याची दिवाळीपर्यंत तरी वाट पाहावी लागणार आहे. दसरा-दिवाळी दरम्यानचा हा कालावधी महत्त्वाचा ठरणार आहे. सणांमध्ये पाणीटंचाई झाल्यास नागरिकांचा रोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महापालिकेने सध्या मिळणाऱ्या पाण्यातच पूर्ण शहराला दररोज पाणी कसे मिळेल याचा विचार सुरू केला आहे. त्यातून सध्याच्या दररोजच्या वेळेत थोडी-थोडी कपात करून साऱ्यांना पाणी दिले जाणार आहे. त्याचे वेळापत्रक ठरवल्यानंतर दिवाळीनंतर दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन सुरू केले जाणार आहे.

चौकट
थेट पाईपलाईन ठरणार आधार
काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे मिळणारे पाणी या स्थितीत शहरवासीयांसाठी आधार ठरणार आहे. दिवाळीपर्यंत ही योजना कार्यान्वित झाली व पाणी वितरण झाले तर महापालिकेवर शहरात दिवसाआड पाणी देण्याचीही स्थिती येणार नाही. हा विचार करताना धरणामध्ये पाणी असले तरी गळती दुरुस्ती करण्याचे ठरवले तर तिथेही पाणी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणात पाणी असले तरी ते जूनपर्यंत टिकवायचे असल्याने जपूनच वापरावे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com