

लोगो ः सकाळ इम्पॅक्ट
-
47871
पैलवानांनीच केला आखाडा स्वच्छ
शाहू खासबाग कुस्ती मैदानाची दुरवस्था थांबवण्यासाठी पुढाकार
कोल्हापूर, ता. २८ ः महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक शाहू खासबाग कुस्ती मैदानाची होत असलेली दुरवस्था थांबवण्यासाठी अखेर पैलवानांनाच कंबर कसावी लागली. विविध तालमीत सराव करणाऱ्या पैलवानांनी स्वतः हातात खोरी घेत आखाड्यातील गवत एक दिवसात साफ करून मातीची मशागत केली.
कुस्ती मैदानातील प्रेक्षकांच्या जागेवर मोठे गवत वाढते म्हणून त्याचा ठेका दिला जातो. पण ते गवत उगवू नये म्हणून काही व्यवस्था केली जात नाही. यावेळी तर मुख्य आखाड्यातच गवत उगवले. आखाड्यात वाढलेल्या गवताचे छायाचित्र ‘सकाळ’ ने २४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करून कुस्ती मैदानाची उपेक्षा मांडली होती. त्यानंतर महापालिकेची यंत्रणा जागी होऊन प्रेक्षक बसतात तेथील गवत, झुडपे काढण्यास सुरुवात केली. पण, ज्या आखाड्यात देश-विदेशातील नामवंत मल्लांनी कौशल्य दाखवले, तो आखाडा कोल्हापूर शहर व जिल्हा नागरीक कृती समितीच्यावतीने अशोक पोवार, वस्ताद विश्वास हारूगले, रमेश मोरे यांच्या पुढाकारातून पैलवानांनी एका दिवसात स्वच्छ केला. तालमीतील खोरी आणून गवत तर काढलेच पण दबलेल्या मातीही खणून तिची मशागत केली. सभोवतालचा परिसरही चकाचक केला. तसेच कापलेले गवत, झाडे-झुडपे बाहेर टाकण्याचे कामही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर न टाकता पैलवानांनी स्वतः बाहेर नेऊन टाकले. पावसाळ्यामुळे काही दिवस बंद असलेली कुस्ती प्रात्यक्षिके येथून पुढे सकाळी व सायंकाळी सुरू केली जाणार आहेत. मैदानाची शान राखण्याचे काम केले जाणार आहे.
चौकट
दहा हजाराच्या साहित्यासाठी भीकमांगो आंदोलन
आखाड्यातील मातीची मशागत करण्यासाठी दोन मोठी खोरी, पाणी मारण्यासाठी पाईप, मातीची पातळी एकसारखी करण्यासाठी लाकडी फळी आदींची मागणी दीड वर्षापासून महापालिकेकडे केली. पण चालढकल सुरू आहे. वेगवेगळ्या तालमीतील खोरी मागून आणून मातीची मशागत केली जात आहे. मैदानाच्या नूतनीकरणासाठी सुमारे दहा कोटी रुपये खर्च केले, पण मैदानाच्या मशागतीसाठी लागणाऱ्या साहित्यासाठी फक्त आठ ते दहा हजार रुपये देण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. आठ दिवसांत आठ ते दहा हजार रुपयांचे साहित्य महापालिकेने दिले नाही तर पैलवान व कार्यकर्ते भीक मागो आंदोलन करून प्रशासनाचा निषेध करणार आहोत, असा इशारा कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव अशोक बळीराम पोवार यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.