राजकीय बातमी

राजकीय बातमी
Published on

भाजप, शिंदे गटाला प्रत्येकी एक जागा

लोकसभेला महायुतीचा फॉर्म्युला ः ‘कमळ’ चिन्हावर लढण्यासाठी भाजपचा आग्रह

निवास चौगले ः सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २८ ः आगामी लोकसभेसाठी जिल्ह्यातील दोन जागांपैकी एक जागा भारतीय जनता पक्षाने चिन्हावर लढवावी, असा सूर पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. त्यातून एक जागा भाजपला तर एक जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला देण्याचा प्राथमिक फॉर्म्युला महायुतीत निश्‍चित झाला आहे. भाजपला जागा कोणती द्यायची हा निर्णय त्यावेळची परिस्थिती पाहून घेतला जाणार आहे.
लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजप-सेनेची युती होती. युतीत जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा हे दोन्ही मतदारसंघ त्यावेळच्या शिवसेनेच्या वाट्याला आले. कोल्हापुरातून प्रा. खासदार संजय मंडलिक तर हातकणंगलेतून खासदार धैर्यशील माने विजयी झाले. गेल्यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर जिल्ह्यातील या दोन्ही खासदारांनी श्री. शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. यावर्षी जुलै महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीला खिंडार पाडून भाजप-शिंदे गटाच्या आघाडीत गेले. राज्यातील या घडामोडींचा परिणाम जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीत दिसणार आहे.
राज्य पातळीवर भाजप-सेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यासह अन्य मित्रपक्षांची महायुती आकाराला आली आहे. यात राज्यातील ४८ पैकी २६ मतदारसंघ भाजपच्या वाट्याला तर उर्वरित २२ जागा या शिंदे व अजित पवार गटाला विभागून देण्याचा प्राथमिक फॉर्म्युला तयार झाला आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपला २५ जागा मिळाल्या होत्या, त्यापैकी २३ जागा त्यांनी जिंकल्या. २०२४ साठी त्यांनी एका वाढीव जागेची मागणी केली आहे. ही वाढीव जागा कोल्हापूर किंवा हातकणंगलेची असू शकते. यापैकी कोणती जागा भाजपला जाणार याविषयी उत्सुकता आहे.
सद्यस्थितीत महायुतीतील राष्ट्रवादी व भाजपकडेही दोन्हीही मतदारसंघात प्रबळ उमेदवार नाही. जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही. राज्यात आणि देशात सत्ता असलेल्या भाजपची जिल्ह्यात केविलवाणी अवस्था आहे. भाजपची ही उणीव भरून काढण्यासाठी दोनपैकी एक तरी जागा भाजपला मिळावी, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची भावना आहे. जागा मिळाली की मग उमेदवार आहे त्यापैकीच रहाणार की बदलला जाणार याची चर्चा करता येईल. त्यात कोल्हापूर लोकसभेसाठी भाजपचे कार्यकर्ते आग्रही आहेत. या मतदारसंघात शहरातील दोन तर शहराला लागून असलेला एक असे विधानसभेचे तीन मतदारसंघ येतात. शहरी भागात भाजपला मानणारा मोठा वर्ग असल्याचा दावा केला जातो, त्यातून कोल्हापुरातूनच भाजपचे ‘कमळ’ चिन्ह रिंगणात असावे, अशी भावना कार्यकर्त्यांची आहे.
...
अंतर्गत सर्वे धक्कादायक
भाजपने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही लोकसभा मतदारसंघांचा अंतर्गत सर्वे केल्याचे समजते. या सर्वेतून काही धक्कादायक बाबी पक्ष नेतृत्त्वापर्यंत पोहचल्या आहेत. उमेदवारी देताना किंवा मतदारसंघाची अदलाबदल करताना या बाबी विचारात घेतल्या जाण्याची शक्यता आहे. दोन्ही जागांवर शिंदे गटाचा दावा ठाम असला तरी जिल्ह्यातील एका जागेच्या बदल्यात अन्य जिल्ह्यातील एक जागा शिंदे गटाला देऊन त्याची भरपाई केली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com